मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांचा पाठिंबा मिळवित असताना त्याआधीपासूनच मराठी प्रेक्षक छोट्या पडद्यावरील ऐतिहासिक मालिकांना भरपूर प्रेम देत होते अथवा आहेत. त्यामुळेच प्रत्येक वाहिनीवर एक तरी ऐतिहासिक मालिका सुरु असलेली दिसते. सोनी मराठीवर एक नवीन ऐतिहासिक मालिका येऊ घातली आहे जिचे नाव आहे ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.
या मालिकेचा टिझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला असून या मालिकेतली मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोचली होती. यासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. ‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अश्या ऑडिशन्स घेण्यात आल्या.