मराठी प्रेक्षकांच्या मनात जसं सैराटचं स्थान आहे तसेच बाहुबलीचे सुद्धा आहे. भलेही तो चित्रपट दाक्षिणात्य प्रेक्षकांसाठी बनविला होता परंतु हिंदीमध्ये डब करून वितरित केल्यावर संपूर्ण भारतात, महाराष्ट्रासकट, त्याने तिकीट बारीवर धुमाकूळ घातला. अभिनेता प्रभास ने साकारलेल्या बाहुबली ने इतिहास रचला होता. निष्णात दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांचे दिग्दर्शन, उच्च निर्मितीमूल्ये, आधुनिक तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा योग्य वापर, विराट सेटस् आणि त्याला मिळालेली उत्कृष्ट अभिनयाची साथ यामुळे बाहुबली प्रचंड प्रमाणात यशवी चित्रपट ठरला. त्याचा दुसरा भाग जो बाहुबलीची आधीची कथा सांगत होता तोदेखील बॉक्स ऑफिसवर धमाल करून गेला.
याच भव्य दिव्य ‘बाहुबली’च्या या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी दिवाळी भेट आणली आहे. डोळे दिपवून टाकणाऱ्या ‘बाहुबली’च्या भव्यतेचे स्वप्न प्रत्येकाला घरबसल्या दाखवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नक्कीच अनमोल दिवाळी भेट ठरणार आहे. आपला मराठीबाणा दाखवत ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने बाहुबलीचा खास मराठमोळा साज आणि त्याच्या तोडीस तोड मराठी चित्रपट आणताना कोणतीही कसर सोडलेली नाही. यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.
अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकार याच्याशी जोडले गेले आहेत.
मराठी ‘बाहुबली’चे लेखन स्नेहल तरडे यांनी केलं आहे. डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला असून देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे. कौशल इनामदार यांचे संगीत दिग्दर्शन असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.