नवी दिल्ली- बॉलिवूड गायक यो यो हनी सिंग उर्फ हिरदेश सिंहच्या पत्नीने तीस हजारी न्यायालयात घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याचिकेत शालिनी सिंगने म्हटले आहे की, हनी सिंह त्यांच्या हनीमूनच्या काळापासून तिला त्रास देत होता.
शालिनीने याचिकेत म्हटले आहे की, मॉरिशसमध्ये हनीमून दरम्यान हनी सिंगच्या वागण्यात बदल होऊ लागले. जेव्हा शालिनीने हनीसिंगला याबद्दल विचारले तेव्हा त्याने तिला बेडवर ढकलले आणि सांगितले की कोणीही हनी सिंगला प्रश्न विचारण्याचे धाडस करीत नाही, त्यामुळे तूदेखील प्रश्न विचारु नकोस.
हनीमूनच्या काळात घडलेल्या एका घटनेबाबत याचिकेत म्हटले आहे की, हनी सिंग हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडला आणि 10-12 तास परत आला नाही. शालिनीसाठी ती जागा नवीन होती, ज्यामुळे ती खोलीत राहिली आणि हनी सिंगची वाट पाहत राहिली. त्या दिवशी हनी सिंग जेव्हा रात्री उशिरा परतला तेव्हा तो नशेत होता.