मराठी चित्रपट निरनिराळे प्रयोग करण्यात प्रसिद्ध आहेत. कथानक ‘हिरो’ असलेला विषय निवडून मराठीत जागतिक ख्यातीचे चित्रपट बनले आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी पूजा सावंत अभिनित ‘लपाछपी’ हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या भयपटाने व्यावसायिक यश तर मिळविलेच परंतु अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून अनेक बक्षिसं मिळविली. विशाल फुरिया दिग्दर्शित या चित्रपटाची हिंदीतील अनेकांनी दखल घेतली होती आणि आता त्याचा हिंदी रिमेक येतोय. ‘छोरी’ असे नाव असलेल्या या हॉरर चित्रपटाची पहिली झलक नुकतीच बाहेर आली आहे.
अमेझॉन प्राईम व्हिडीओने त्यांचा आगामी हॉररपट 'छोरी'ची झलक जगासमोर सादर केली असून ही झलक थेट ‘भूतिया’ नसली तरीही अंगाचा थरकाप उडवणारी आहे. भीतीदायक आणि अंगात वीज चमकल्यागत वाटेल असे हे मोशन पोस्टर आहे. ज्यांना अंगावर काटा आणणारा अनुभव घ्यायची इच्छा असेल, त्यांच्यासाठी हा सिनेमा बनविला आहे. अमेझॉन ओरीजनल मुव्ही 'छोरी' प्रेक्षकांसाठी सज्ज झाला असून लवकरच धडकी भरवणारे अनुभव देण्यासाठी प्रदर्शित होईल. भयंकर रोमहर्षक सफर घडवणारा भयपट तयार आहे आणि हे मोशन पोस्टर पाहिल्यावर बरेचजण रात्री झोपताना नक्कीच लाईट लावून झोपतील.
छोरी हा एक भयपट असून तिचे दिग्दर्शन विशाल फुरिया याने केले आहे, तर भूषण कुमार, क्रिशन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा हे निर्माते आहेत. मराठी फिल्म लपाछपीचा हा रिमेक असून त्यात मुख्य भूमिकेत नुसरत भरूचा दिसेल. तिच्यासोबत मिता वशिष्ठ, राजेश जैस, सौरभ गोयल आणि यानिया भारद्वाज झळकणार आहेत.