आपण सर्वचजण बालपणापासूनच चार्ली चॅप्लिनचे मूकपट पहात आलो आहोत. केवळ संगीताच्या साथीनं चार्लीनं आपल्या हयातीत अभिनयाच्या बळावर असंख्य प्रेक्षकांचं मनोरंजन केलंच, पण आजही त्याचे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांची करमणूक करत आहेत. चार्ली चॅप्लिन हे नाव आज प्रत्येक माणसाला माहीत आहे. १९२० पासून चार्लीनं मूक चित्रपट क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं. याच जागतिक पातळीवरील अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार्ली चॅप्लिन या महानायकावर आधारीत नाटक रसिकांसमोर सादर करण्याचं शिवधनुष्य मिलाप थिएटरनं उचललं आहे.
त्याच्या जीवनाबाबत सांगणारे अनेक चित्रपट, पुस्तकं, नाटकं आली. याच वाटेवरील 'द क्लॅप' हे एक वेगळ्या धाटणीचं नाटक आहे. वेगळं अशा अर्थानं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी बऱ्याचदा समोर येत नाहीत. आपण काही घटना एकाच चष्म्यातून बघतो आणि त्या व्यक्तीबद्दलचं मत बनवतो. विशेषत: फेमस व्यक्तींच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडतात, ज्यानं त्यांचं आयुष्य बदलतं. याच जोडीला त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या लोकांचंही जीवन पालटतं. चार्लीच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्या लोकांसमोर फार कमी आल्या आहेत. त्या गोष्टींमधून एक वेगळाच चार्ली आणि त्याच्याभोवतीची माणसं उलगडत जातात. चार्लीच्या आयुष्याचा हा प्रवास तर इंटरेस्टींग आहेच, पण अजून बऱ्याच गोष्टी मनोरंजक आहेत, ज्या हे नाटक पाहताना रसिकांना अखेरपर्यंत बांधून ठेवतील आणि नाटक संपल्यावर 'द क्लॅप' आपसूक वाजेल. याच कारणामुळं या नाटकाचं शीर्षक 'द क्लॅप' असं ठेवण्यात आलं आहे.
प्रत्येक खरा नाट्यकर्मी, रंगकर्मी वरच्या पायरीवर जाण्यासाठी कायम धडपडत असतो. ही धडपड करत असताना, कधी ठेचकाळतो, कधी थोडी माघार घेतो कधी हवे ते साध्य करतो, तर साध्य वाटत नसतानाही पलीकडे येऊन पोहचतो. मिलाप मध्ये सगळे एकमेकांना हात तर कधी आधार देऊन, नवनवीन प्रकल्प हाती घेऊन या रंगमंचावरील आभासी जगातला आपला अनुभव वाटणार आणि वाढणार यात शंकाच नाही.