मुंबई- कोरोना काळाचा फटका कलाक्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. कठीण काळात रंगकर्मींना राज्यसरकारने मदत करावी यासाठी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची कलाकारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन काही मागण्या केल्या आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्व क्षेत्रासह कलाक्षेत्राला ही मोठ्या प्रमाणात बसला आहे. राज्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असली. तरी, कलाक्षेत्रातील निर्बंध अद्यापही काढण्यात आलेले नाही. राज्य सरकारकडून अटी-शर्ती नुसार चित्रीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र नाट्यगृह, चित्रपटगृह अद्यापही बंद असल्याने कलाक्षेत्रातील लोकांना याचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्यात यावी यासाठी नाट्यकर्मींचे एक शिष्टमंडळ कला व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना भेटले. लवकरात लवकर कलावंताना काम सुरू करण्याची मुभा राज्य सरकार कडून देण्यात यावी, अशी मागणी कलाकारांकडून करण्यात आली आहे. अभिनेते विजय पाटकर आणि लावणीसम्राज्ञी मेघा घाटगे यांच्यासह काही कलाकारांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
राज्य सरकार कलावंतांच्या पाठीशी
गेल्या दीड वर्षापासून कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका सर्वात जास्त कला क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कलावंतांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. रंगकर्मी यांच्या मागण्यांचा आदर करत राज्य सरकार लवकरात लवकर त्यांना मदतीचा हात देईल असा विश्वास यांनी या भेटीनंतर अमित देशमुख यांनी रंगकर्मी आणि कलाकारांना दिले. मात्र चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सची अनुमती भेटल्याशिवाय सुरू करणे शक्य नसल्याचे यावेळी अमित देशमुख यांनी रंगकर्मींना सांगितले. मात्र कलाकारांच्या इतर मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून लवकरात लवकर त्या मागण्यांसंदर्भात पावले उचलली जातील असे आश्वासनही अमित देशमुख यांनी दिले.
कलाकारांनी राज्य सरकारकडे केलेल्या मागण्या
एकपात्री किंवा दोन-तीन लोकांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात किंवा मोकळ्या जागेत सादर होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी मिळावी.
फी न भरल्यामुळे रंगकर्मींच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. तात्काळ संबंधीत शिक्षण संस्थांशी बोलून हा प्रश्न निकाली काढावा.
गेल्या दिड वर्षात काम नसल्याने कमाई झालेली नाही. त्यामुळे घरभाडे आणि इलेक्ट्रिसिटी बील भरण्यास अडचण होत आहे. आपल्या अखत्यारीत असलेल्या संबंधीत अस्थापनांना आदेश देऊन रंगकर्मींना सवलत मिळून दयावी.
अटी नियमांचे पालन करुन रंगकर्मींना आमची कला सादर करण्याची परवानगी मिळावी.
काही प्रमाणात चित्रीकरण सुरु झाले आहे परंतु लोकल प्रवासाची मुभा नसल्याने, मिळणारे उत्पन्न आणि खर्च तसेच वेळेचा तळमेळ घालणे कठीण झाले आहे. त्यामुळे शुटींग चालु असलेल्या कलाकार, तंत्रज्ञाना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी.