हैदराबाद- 'तू म्हणशील तसं' नाटकाचा १०१ वा प्रयोग हैदराबादच्या रवींद्र भारती नाट्यगृहात उत्साहात पार पडला. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून हा प्रयोग झाला. हेल्थ लीगच्या वतीने कॅप्टन स्वरुप लेले यांनी या प्रयोगाचे आयोजन केले होते.
कोरोना संसर्गामुळे गेली वर्षभर जागतिक रंगभूमी शांत आहे. गेली वर्षभर आभासी माध्यमातून काही नाट्यप्रयोग सादर झाले. परंतु, प्रेक्षकांविना, थेट प्रतिसादाविना रंगभूमीवरील कलाकार खुलत नाहीत. मराठी नाटकांसाठी आता थिएटर्स काही अटींवर खुली झालेली असली तरी प्रेक्षक अजूनही नाटकाला जायला कचरताहेत. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना हैदराबादकरांनी एक सुखद धक्का दिला. हेल्थ लीग या संस्थेच्या वतीने 'तू म्हणशील तसं' हा मराठी नाट्य प्रयोग हैदरबादच्या रवींद्र भारतीमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याला भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला.
'तू म्हणशील तसं'चा हैदराबादमध्ये झाला १०१ वा प्रयोग 'तू म्हणशील तसं' हे नाटक राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केले आहे. संकर्षण कऱ्हाडे याने याचे लेखन केले असून मुख्य भूमिकाही तो साकारत आहे. भक्ती देसाई यांनी त्याला चांगली साथ दिली आहे आणि दोघांची केमिस्ट्री अगदी करेक्ट जुळून आली आहे. महाराष्ट्रीय प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुक केलेल्या या नाटकाचे नुकतेच १०० प्रयोग पार पडले होते. हे नाटक हैदराबादमधील मराठी रसिकांना हवे होते. याची जोरदार मागणी सोशल मीडियावर होत होती. अखेर रसिकांचे हे स्वप्न हेल्थ लीगच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे तेलंगणा सरकारने आखून दिलेल्या सर्व कोविड-१९ नियमांचे पालन करून हा प्रयोग आयोजित केला होता.
हेही वाचा - सोनाली कुलकर्णी करणार ‘क्राइम पॅट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’चे सूत्रसंचालन!