ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे नुकतेच निधन झाले. ‘एक हजार में मेरी बेहना है’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी ‘बडी बीजी’ ही व्यक्तिरेखा साकारली होती आणि ती बरीच प्रसिद्ध झाली होती. ही प्रेमळ ‘आजी’ म्हणजेच ‘बडी बीजी’ तिच्या सहकलाकारांची, तिच्या प्रेमळ स्वभावामुळे, लाडकी होती. त्यांच्या निधनामुळे अनेक कलाकारांना आपल्याच कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले असे वाटतेय. ‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेत तरला जोशी यांच्यासह काम केलेल्या अभिनेत्री निया शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी दिली. तरला जोशी यांच्या निधनाच्या बातमीने टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे.
तरला जोशी यांनी ‘बंदिनी’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ आणि ‘एक हजार में मेरी बेहना है’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. ‘बंदिनी’ या मालिकेतून तरला जोशी यांना खरी ओळख मिळाली होती. त्यांच्या निधनाचे नेमके कारण समोर आलेले नाही. त्यांची सहकलाकार निया शर्माने तरला जोशी यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिले, 'RIP बडी बीजी.. तुमची कायम आठवण येईल. तरला जी तुम्ही कायम आमच्या बडी बीजी राहाल.' ‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझासोबत काम केले होते.