महाराष्ट्राची लाडकी ‘जान्हवी’ दिसणार ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत! - तेजश्री प्रधान लेटेस्ट न्यूज
स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत लवकरच अभिनेत्री तेजश्री प्रधान ( Tejashree Pradhan ) हिची एंट्री होणार आहे.
मुंबई -‘होणार सून मी त्या घरची’ मधील महाराष्ट्राची लाडकी ‘जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान ( Tejashree Pradhan ) सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. परंतु ती आता ‘फुलाला सुगंध मातीचा’ ( Serial Phulala Sugandh Maticha ) या मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून प्रेक्षकांना दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. शिर्डीमधल्या आनंद जत्रेत अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत कीर्ती सहभागी होणार असून या स्पर्धेचं सूत्रसंचालन तेजश्री प्रधान करणार आहे. तेजश्री सेलिब्रिटी होस्ट म्हणून या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे.
या मालिकेत लवकरच अभिनेत्री तेजश्री प्रधानची एण्ट्री होणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली, ‘फुलाला सुगंध मातीचा हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या मालिकेत मी तेजश्री प्रधान म्हणूनच एण्ट्री घेणार आहे. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करते आहे. त्यामुळे उत्सुकता आहे. मालिकेत मी एका अनोख्या स्पर्धेचं सूत्रसंचालन करणार आहे. ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली आणि खास बात म्हणजे माझा या मालिकेतला लूक खूप विचारपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे. कीर्तीच्या प्रवासात तिला तेजश्री प्रधानची साथ कशी मिळणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.’
शिर्डीमध्ये भरवण्यात आलेली अष्टपैलू व्यक्तिमत्व ही स्पर्धा कीर्तीसाठी अतिशय महत्त्वाची असून यानिमित्ताने तिच्या बुद्धीमत्तेची आणि हजरजबाबीपणाची कसोटी लागणार आहे. कीर्ती ही स्पर्धा जिंकणार का अथवा तेजश्री तिला कशी मदत करणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे.