लॉकडाऊनच्या काळात भलेही सर्वजण घरात कैद होते, चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद होती, चित्रीकरणंही बंद होती परंतु संगीतक्षेत्रातील काम घरबसल्याही सुरु होते. या काळात अनेक नवीन ‘सिंगल्स’ जन्माला आली आणि अनेक गाणी तयार करण्यात आली. संगीतकार मंदार आगाशे यांनी तर कविवर्य सुरेश भट यांच्या वीस कविता संगीतबद्ध केल्या आणि त्याचा म्युझिक अल्बम तयार केला. ‘ठीक आहे छान आहे मस्त आहे' असे नाव धारण केलेल्या या म्युझिक अल्बम चे नुकतेच ऑनलाइन कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
संगीतकार मंदार आगाशे म्हणाले की, “करोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात रोज हा काव्यसंग्रह वाचत होतो. रोज चाली सुचत होत्या, त्यातून वीस गाणी तयार झाली. माझा सुरेश भट यांच्याशी बराच स्नेह होता. ते मला त्यांचे शब्द आणि माझी स्टाइल मिक्स करायला सांगायचे. आम्ही एकमेकांना पत्र पाठवायचो. माझ्यासारख्या नव्या संगीतकाराला खूप प्रोत्साहन द्यायचे, उदाहरणार्थ त्यांनी पाठवलेल्या प्रत्येक पत्राच्या शेवटी ते "गो अहेड" लिहायचे.”
नव्या संगीत रचनांचा समावेश असलेल्या 'ठीक आहे छान आहे मस्त आहे' या म्युझिक अल्बममध्ये समाविष्ट असलेली वीस गाणी राहुल देशपांडे यांच्यासह गायिका आर्या आंबेकर, प्रांजली बर्वे, धनश्री देशपांडे गणात्रा यांनी गायली आहेत. म्युझिक अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आगाशे यांनी या म्युझिक अल्बमच्या निर्मितीचा प्रवासही विशद केला.
या अल्बमची गाणी गाताना खूपच मजा आली. मला नेहमी भक्तीगीत किंवा शांत पद्धतीची गाणी गायला मिळतात, पणअल्बम मधील ‘रॅप’प्रकारातलं गाणं गाण्याची संधी मला मिळाली. सुरेश भटांचे शब्द इतके शक्तिशाली आहेत कि त्यांना न्याय देण्यासाठी मी वाचिक अभिनय केला आहे. हि गाणी तुमच्या मनात नक्कीच घर करतील असं धनश्री देशपांडे गणात्रा यांनी सांगितलं