डॉ. श्रीराम लागू यांना पडद्यावर साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. मात्र, त्याहून जास्त त्यांच्यासारखा माणूस होण्याचा मी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुमित राघवन याने 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
डॉ. लागू हे 'हॅम्लेट' या नाटकाच्या प्रयोगाला आले होते तेव्हा प्रयोग पाहताना त्यांनी चार पाच वेळा प्रसंग पाहून वाहवा म्हणत दाद दिली होती. प्रयोग संपल्यावर मी साधे कपडे घालून त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी मला आधी ओळखलं नाही. त्यावर दीपा ताईंनी त्यांना अरे हाच आपला 'हॅम्लेट' असं सांगितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी मला दिलेली ही दाद एखाद्या पुरस्कारहून मोठी ठरली. त्यानंतर ..'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमाच्या निमित्ताने त्याच्याशी आमची चक्क अडीच तास भेट झाली होती. तेव्हा काही वेळाने बोलता बोलता ते थेट 70 च्या दशकात निघून गेले होते. त्यावेळच्या रंगभूमीवरचा संपूर्ण पटच त्यांनी आमच्यासमोर उलगडून दाखवला. खरेच मराठी रंगभूमीवरचा सच्चा 'नटसम्राट' आज आपल्यातून हरपला आहे.