महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'डॉ. लागू यांच्यासोबत काम करण्याची इच्छा शेवटी अपूर्ण राहिली'

डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने अनेक कलावंत त्यांच्या आठवणी जागवत आपले दुःख व्यक्त करीत आहे. आजचा मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने 'डॉक्टरां'सोबत काम करण्याची इच्छा अपूरी राहिल्याचे म्हटले आहे.

Subodh Bhave remembering Dr. Shriram Lagoo
सुबोध भावेने डॉ. श्रीराम लागूंच्या आठवणी जागवल्या.

By

Published : Dec 19, 2019, 3:46 PM IST

मुंबई -डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत पुष्पक विमान सिनेमात काम करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची तब्येत पाहून मी ते धाडस केले नाही. मात्र त्यांच्यासारख्या अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा अखेर अपूर्णच राहिली, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुबोध भावे यांनी दिली.

डॉक्टर लागू यांच्याशी मी पुण्यात असल्यापासूनचे ऋणानुबंध होते. एका वेब पोर्टलसाठी काम करताना सगळ्यात आधी मी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर दोघांची 'गोष्ट' या नाटकात मी त्यांना आणि निळूभाऊंना एकत्र पाहिलं होतं. त्यानंतर त्या नाटकात काम करणाऱ्या प्रसाद ओकने मला त्याची रिप्लेसमेंट करण्याबाबत विचारलं होतं. मात्र त्यावेळी प्रायोगिक रंगभूमीवर मी जास्त रमलो असल्याने या सुवर्णसंधी मी नाकारले. त्यानंतर पुण्यातच सूर्य पाहिलेला माणूस या नाटकात त्यांचा अभिनय पहिला आणि निव्वळ थक्क झालो होतो. त्यांचं मित्र हे नाटकही मी पाहिलं होतं. त्यातील अभिनेत्री ज्योती चांदेकर आणि डॉ. लागू यांची जुगलबंदी निव्वळ लाजवाब होती.

पुण्याहुन मुंबईत आल्यानंतर माझे 'कळा ह्या लागल्या जीवा' हे नाटक त्यांनी पाहून माझं कौतुक केलं होतं. पुढे माझा बालगंधर्व हा सिनेमा त्यांनी पहिला आणि त्यानंतर त्यांनी मला नारायणराव म्हणायला सुरुवात केली होती. मात्र नंतर त्यांना स्मृतिभ्रंश झाल्यानंतर त्यांना काहीही आठवत नव्हतं. कट्यार काळजात घुसली या सिनेमाचा मुहूर्त पुण्यात एफटीआयआय या संस्थेच्या आवारात शूट झाला होता. त्यावेळी स्वतः नास्तिक असूनही लोकांची श्रध्दा जपण्यासाठी त्यांनी कॅमेरा आणि गणपतीच्या मूर्तीला हार घातला होता. त्यानंतर संपूर्ण सीन शूट होइपर्यंत ते समोर बसून होते.

'..आणि काशिनाथ घाणेकर' या सिनेमाच्या खास स्क्रीनींगसाठी ते आले होते तेव्हा सुमित राघवनची एन्ट्री होताच त्यांनी अरे हा तर मीच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, अखेर गाडीत बसून घरी जाताना त्यांनी अरे काशिनाथ कुठे आहे, त्यालाही बोलवा अस म्हणाले होते. या आठवणी कधीही विसरता येणार नाहीत. मी खरच नशीबवान आहे की, मला त्यांचा सहवास मिळाला. मराठी रंगभूमीवरील आधारवडासारखी ही माणसं होती, त्यांच्या जाण्याने आम्हा सगळ्यांचं कधीही न भरून येणार नुकसान झालं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details