बिग बॉस मराठीच्या दुसऱ्यापर्वातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट मानल्या जाणाऱ्यादेवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेने आपली संघर्षकथा बिगबॉसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रसमोर पहिल्यांदाच मांडली. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असण्यापासून ते समुद्रापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर घेण्यापर्यंतचा आपला संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास शिवानीने बिग बॉसमध्ये सगळ्यांना सांगितला.
शिवानी सुर्वेची स्ट्रगल स्टोरी : एकेकाळी रोजच्या जेवणासाठीही करावा लागायचा संघर्ष - Big Boss Marathi
बिग बॉस मराठीमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने आपली संघर्ष कथा सर्वांना सांगितली. उपाशीपोटी राहून स्ट्रगल केलेल्या शिवानीचा प्रवास थक्क करणारा आहे.
मुळची चिपळुणची आणि लहानाची मोठी डोंबिवलीला झालेली शिवानी सांगते, “अभिनय क्षेत्रात अपघातानेच आले. आई-वडिलांचे एक्झिबिशन शिवाजीमंदिर नाट्यगृहाच्या शेजारी होते. तिथे मनोहर नरे यांनी ओम नाट्यगंधच्या ‘मांगल्याचे लेणे’ नाटकात मला संधी दिली. या नाटकाच्यावेळी मी डोंबिवलीहून सगळीकडे प्रवास करायचे आणि एकदा एक अख्खी रात्र मला आजीसोबत प्लॅटफॉर्मवर काढावी लागली. त्यामुळे आईने ठरवलं आता मुंबईतच राहायला यायचं. म्हणून आम्ही सायनला राहायला यायचा निर्णय घेतला. पण त्यानंतर आमची आर्थिक स्थिती खूप खालावली.”
ती सांगते, “ एकवेळ अशी आली की, जेव्हा घरात खायला काही घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. कित्येकदा माझ्या लहान बहिणीला पारले-जीच्या पुड्यावर अख्खा दिवस काढायची वेळ आलीय. तेव्हा वाण्याकडून सामान आणताना अपूऱ्या पैशाअभावी दहा रुपयांची डाळ, दहा रुपयाचे तांदुळ आणि दहा रुपयाचे तेल आणावे लागायचे. तेवढेच पैसे कसेबसे असायचे. त्यावेळी मी ठरवलं, की घरच्यांसाठी काहीतरी करायचं. आणि आज मला अभिमान आहे की, मी वयाच्या 16 वर्षी गाडी घेतली आणि सतराव्या वर्षी आईचे समुद्रापासून 15 मिनीटांवर स्वत:चं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण केले. “