महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दिनकर कुंभार यांच्या 'घनवाद' शैलीतील चित्रांचे मुंबईत प्रदर्शन - Dinkar Kumbhar

चित्रकार दिनकर कुंभार यांच्या 'घनवाद' शैलीतील चित्रांचे प्रदर्शन मुंबईत होणार आहे. वेगवेगळ्या कोनातून चित्रण करुन त्या घटकांचे सर्व बाजुनी दर्शन घडविण्यांचा विचार घनवादामध्ये मांडण्यात येतो. 18 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान हे प्रदर्शन हॉटेल ट्रायडंट आर्ट गॅलरीत पार पडेल.

दिनकर कुंभार

By

Published : Feb 15, 2019, 8:23 PM IST


कोल्हापूर - मुंबई येथील हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट आर्ट वॉक गॅलरी, नरिमन पाँईट येथे कोल्हापूर येथील चित्रकार दिनकर कुंभार यांच्या घनवाद शैलीतील चित्रांचे प्रदर्शन होणार आहे.

या प्रदर्शनात मांडण्यात येणार्‍या घनवाद शैलीतील रचना चित्रांमधून मानवाचं धावत जग, यातून सुटण्याची त्याची धडपड आणि धडपडीतून पुन्हा त्याच विळख्यात सापडलेलं त्याचं चिंतनशील मन याबद्दलची एक अनुभूती त्यांच्या ‘रनर‘ आणि ‘ह्यूमन रेस‘ या चित्रांमधून दिसते. या प्रकारातील अनेक चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

घनवादी शैलीमध्ये अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. या शैलीचा अभ्यास, त्या अभ्यासावर सातत्यानं केलेलं चिंतन आणि चिंतनातून कॅनव्हॉसवर साकारलेले विषय, त्यातील रंगसंगती आणि यातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य करण्याचा केलेला वेधक प्रयत्न यातून त्यांची मानवी जीवनाबाबतची प्रगल्भता जाणवते.

जागतिक कलाक्षेत्रात क्युबिझम (घनवाद) महत्त्वपुर्ण मानला जातो. सर्वसाधारणपणे जसे दिसते तसेच रेखाटण्याशिवाय चित्रकारजवळ पर्याय नसतो. द्विमीतीत त्रिमितीचा आभास निर्माण करणारी वास्तववादी शैली लोकप्रिय असली तरी हे चित्रण एकाच कोनातून घडत असते. चित्रविषय एकाचवेळी वेगळ्या बाजुने दाखविणे शक्य नसते ही चित्रकारांची मर्यादा आहे. कारण हा कलाप्रकारच एका प्रतलावर चित्रीत केला जाणारा द्विमित आहे. पण ही मर्यादा मोडून काढण्याची बंडखोरी फ्रेंच चित्रकार जॉर्ज ब्राक यांनी 1906 च्या दरम्यान या इझममध्ये काम करण्यास सुरुवात केली तर समकालीन चित्रकार पिकासो यांच्यासारख्या चित्रकारांनीही या शैलीत काम करण्यास सुरुवात केली. एकाच वस्तु घटकांचे वेगवेगळ्या कोनातून चित्रण करुन त्या घटकांचे सर्व बाजुनी दर्शन घडविण्यांचा विचार घनवादामध्ये मांडला गेला. त्यामुळे एकाच पटलावर वेगवेगळ्या प्रतलांच्या रुपात एक एक मिती रेखाटली गेली त्यामुळे घनवादी चित्राकृती क्लिष्ट बनल्या असल्यातरी एक वेगळा दृष्टीकोन कलाशैलीने दिला.

चित्रकार दिनकर शंकर कुंभार यांनाही कलाशिक्षण घेत असताना घनवादाने आकर्षित केले. अभिजात कलेचे शिक्षण घेत असताना त्यांनी क्युबिझम या विषयावर प्रबंध लिहिला. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट कोल्हापूर मधून जी. डी. आर्ट पुर्ण केलेल्या कुंभारांनी व्यावसायिक कलाक्षेत्रात बरेच वर्षे वेगवेगळ्या पध्दतीचे काम केले. त्याचवेळी त्यांनी क्युबिझमचा अभ्यासही सुरू ठेवला. कोल्हापूरची खासियत असणार्‍या वास्तवदर्शी कलाशैलीत चित्रे रेखाटतानाही घनवादाची आस कायम होती. चित्राचा आशय स्पष्ट होईल इतकेच आकार अवकाशात मांडून अवकाश आणि आकार यांचा तोल सांभाळून या कलाकृती रंगवतानाही रंगसंगतीच्या तत्वाला बाधा पोहचणार नाही, याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे या कलाकृतीत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे.

या प्रदर्शनात घनवाद शैलीतील 20 ते 22 रचनाचित्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन दिनांक 18 फेब्रुवारी ते 3 मार्च 2019 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 सर्वांसाठी खुले राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details