मुंबई - बऱ्याचदा काही लिहिलेलं वाचलं, गाणं ऐकलं वा चित्रपटातील अभिनय बघितला की ते किती सोपं आहे असं वाटते. खरंतर ही त्या त्या कलाकाराची असीम मेहनत असते ज्यामुळे समोरच्याला सगळं सोपं वाटते. याच पॉईंटला पुढे नेत विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपी यांनी ‘सोपं नसतं काही’ या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. पाच वर्षांत पाच प्रोजेक्टस्, २१ नॅामीनेशनस्, ११ ॲवॉर्डस् अशी घवघवीत कामगिरी करणाऱ्या विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपी ही निर्मिती संस्था आता एक नवी कोरी वेबसिरीज प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच घेऊन येणार आहे.
अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्यासाठी ‘सोपं नसतं काही’! - अभिजीत खांडेककर
प्लॅनेट मराठीवर विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपी निर्मित ‘सोपं नसतं काही’ या नवीन मराठी वेब सिरीजची निर्मिती केली जात आहे. यात अभिनेता अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
‘सोपं नसतं काही’ या वेब सीरिजचे विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपीचे संतोष रत्नाकर गुजराथी हे या वेब सीरिजचे निर्माते आहेत. या वेब सीरिजचे लेखन, दिग्दर्शन, संगीतकार अशी तिहेरी भूमिका मयुरेश जोशी सांभाळणार आहेत. अभिनेता अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून अभिनेते आनंद इंगळे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपीने याआधी रंगभूमीवर 'ॲब्सोल्युट', 'घरात मॅरीड बाहेर बॅचलर', 'नॉक नॉक सेलीब्रीटी' अशी वैविध्यपूर्ण नाटके तर छोट्या पडद्यावर 'रुद्रम', 'कट्टीबट्टी' अशा मालिकांची निर्मिती केली आहे. 'किस्से बहाद्दर' या वेब सीरिजची निर्मिती देखील त्यांनी केली होती. आगामी ‘सोपं नसतं काही’ या वेब सीरिज मधून नक्की काय सोपं नसतं’ हे जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.