मुंबई -बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. आजवर बरेच बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या बायोपिकला प्रेक्षकांचीही पसंती मिळते. आता अभिनेता सूरज पांचोली देखील एका बायोपिकसाठी सज्ज झाला आहे. बॉक्सिंग क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव 'हवा सिंग' यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्यात येणार आहे. या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
सलमान खाननेही 'हवा सिंग'च्या बायोपिकचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. 'हवा से बाते करेंगे सिंग', असे कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे.
हेही वाचा -'आशिकी' चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण, कपिल शर्मासोबत उलगडणार आठवणी
या पोस्टरमध्ये सूरज पांचोलीचा दमदार लुक पाहायला मिळतो.
कोण आहेत 'हवा सिंग' -
हवा सिंग यांना 'फादर ऑफ द इंडियन बॉक्सिंग' या नावानेही ओळखले जाते. त्यांचा जन्म १६ डिसेंबर १९३७ मध्ये हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील उमरवास येथे झाला होता. वयाच्या १९ व्या वर्षी ते भारतीय सैन्यात भरती झाले होते. येथेच त्यांनी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. १९६० साली त्यांनी चॅम्पियन मोहब्बत सिंग यांना हरवून वेस्टर्न कमांडचा खिताब जिंकला होता.
१६६१ ते १९७२ पर्यंत त्यांनी सलग बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यांचा हा विक्रम आजवर कोणताही भारतीय बॉक्सर मोडू शकलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी बरेच नाव कमावले आहे. १९६२ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये बॉक्सिंग टूर्नामेंटसाठी खेळणाऱ्या स्पर्धकांमध्ये हवा सिंग यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. १९६६ साली त्यांनी आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता.
१९७० साली देखील आशियाई स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकले होते. भारत सरकारकडून त्यांना 'अर्जुन अवार्ड' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा -...म्हणून विद्या बालनसाठी फिल्मफेअर अवार्ड्स खास, शेअर केली आठवण
बॉक्सिंग क्षेत्रातील त्यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी सूरज पांचोलीने त्याच्या शरीरावर विशेष मेहनत घेतल्याचेही लक्षात येते. सूरजचा हा तिसरा चित्रपट आहे. मागच्या वर्षी सूरज 'सॅटेलाईट शंकर' या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याने सैनिकाची भूमिका साकारली होती.
प्रकाश नंबियर हे 'हवा सिंग' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, कमलेश सिंग खुशवाहा आणि सॅम फर्नांडीस हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा -'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मानच्या आवाजातलं गाणं