मुंबई -कोरोना कहर आणि लॉकडाऊनमुळे ‘लग्नाळू’ जोडप्यांची पंचाईत झालीय. ५० लोकांमध्येच लग्न उरकणं अनेकांना जड जातंय, म्हणून अनेक लग्न लांबणीवर टाकण्यात आली आहेत. परंतु, सोनी मराठी वाहिनीवर मात्र लगीनघाई सुरु झाली आहे. 'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये १ जूनपासून विवाह सप्ताह सुरु होतोय. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मोठा थाटमाट असणार आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे काय घडणार आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
श्वर्या आणि सूर्यभानच लग्न 'तू सौभाग्यवती हो' ही मालिकेत तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं. येत्या काही दिवसात ऐश्वर्या आणि सूर्यभान हे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच सोनी मराठी वाहिनीवरील 'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे. परंतु, यानंतर सूर्यभान ऐश्वर्याला बायकोचा दर्जा देऊ शकेल का किंवा त्याची मुलं तिला आपली आई मानतील का हे प्रेक्षकांना पडलेले प्रश्न आहेत. त्यामुळेच, “बांधले जाणार का बंध नव्या नात्याचे, जुळणार का नाते मनाशी मनाचे?” हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे. ‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेतील विवाह सप्ताह १ जूनला संध्या. ७ वा. सुरु होत असून तो अनुभवता येईल सोनी मराठी वाहिनीवर.