मुंबई- कोरोना काळात प्रसिद्धीझोतात आलेलं वेब सिरीज विश्व अजूनही जोरात घोडदौड करीत आहे. अनेक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असून कोरोना काळातील पाच कथानकं घेऊन एक सिरीज आलीय जिचं नाव आहे ‘अनपॉज्ड: नया सफर'. या वेब सिरीज मधील आशा आणि सकारात्मकतेचा संदेश अधोरेखित करणारे गाणे ‘नया सफर’ नुकतेच रिलीज करण्यात आले. सचिन-जिगर यांनी हे शीर्षक गीत संगीतबद्ध केले आहे. कौसर मुनीर हे नया सफरचे गीतलेखक आहेत. अमित मिश्रा यांनी हे गाणे गायले असून यातील शेखस्पीयरने रॅप म्हटले आहे. आशा आणि सकारात्मकता याच सूत्राभोवती हे कथानकही फिरते.
'अनपॉज्ड: नया सफर'मध्ये पाच अभिनव कथांचा समावेश असून त्या आशा, सकारात्मकता आणि नवीन आरंभाचा झरोका आहेत. त्या आपल्याला जीवन आणि भावनांना महत्त्व द्यायला शिकवतात. या कथांमधून प्रेम, उत्कंठा, भीती आणि मैत्री अशा अस्सल मानवी भावनांचे दर्शन घडते – शिखा माकन (गोंद के लड्डू), रुचिर अरूण (तीन तिगाडा), नूपुर अस्थाना (द कपल), अय्यप्पा केएम (वॉर रूम) आणि नागराज मंजुळे (वैकुंठ) या फिल्ममेकरनी कथा जिवंत केल्या आहेत.