फ्रेंडशीप डे येऊ घातलाय आणि त्याचे सेलिब्रेशन होण्यास सुरूवात झाली आहे. नुकतेच बॉलिवूड चित्रपटांचा निर्माता, यातील बऱ्याच चित्रपटांत सलमान खान हिरो होता, निखील नमीत याने ‘नादखुळा म्युझिक लेबल’लाँच केले. या लेबलखाली त्याने नवीन मराठी गाण्यांची निर्मिती सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने नमितने ‘आपली यारी’ नावाचे गाणे लाँच केले. हे गाणे त्याने मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या हस्ते प्रदर्शित केले. महत्वाचे म्हणजे प्रार्थना त्याची बऱ्याच वर्षांपासूनची मैत्रीण आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने प्रार्थनाने निखील नमीतच्या ‘नादखुळा म्युझिक लेबल’ चे आपली यारी हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले. फ्रेंडशीपडेच्या मुहूर्तावर आलेल्या ह्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.
'आपली यारी' गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे. पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.
निर्माता निखील नमीत म्हणाला,”’आपली यारी’ गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि ‘जगात लय भारी’ अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमुळे आम्ही ह्या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय.”