मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या 'द झोया फॅक्टर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रोमॅन्टिक कॉमेडी असलेला हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तिच्यासोबत दाक्षिणात्य स्टार दुलकर सलमान हा देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तो या चित्रपटात क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. तर, सोनम म्हणजेच 'झोया' ही भारतीय क्रिकेट संघासाठी लकी चार्म असल्याचं दाखवण्यात येणार आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यासाठी देखील एक गोष्ट लकी चार्म आहे. ती नेमकी काय आहे, हे त्यानेच एकाच व्हिडिओतून सांगितलं आहे.
सोनम कपूरने रणबीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीरने त्याच्या लकी चार्मचा खुलासा केला आहे. रणबीरला लहानपणापासून ८ या आकड्यावर विश्वास आहे. ८ हा आकडा त्याच्यासाठी लकी असल्याचं त्यानं सांगितलं आहे. कारच्या नंबर प्लेटवरील आकड्यांचीही बेरीज ८ असेल, अशाच कारची तो निवड करतो. विशेष म्हणजे रणबीरची आई नीतू कपूर यांचा वाढदिवसही ८ तारखेला असतो. त्यामुळे ८ हा आकडा त्याच्यासाठी लकी असल्याचा खुलासा त्याने केला आहे.
रणबीरने त्याचा व्हिडिओ सोनमला शेअर केल्यानंतर सोनमने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.