हैदराबाद - सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात येईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या सहदेव दिरदो याच्या 'बचपन का प्यार' गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. सहदेव दिरदोही संपूर्ण भारतात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला होता. त्यावेळी प्रत्येक जण 'बचपन का प्यार' गाणे गुणगुणत होते. त्याचपद्धतीने सध्या एक तरुण गायिका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या एका गाण्याची क्लिप तुफान व्हायरल होत आहे. तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, यू ट्रयुब व ट्विटर सर्वत्र मधूर आवाजाच्या तरुणीची क्लिप पाहायला मिळेल.
काही दिवसांपूर्वी ‘मणिके मागे हिथे’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्याने नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांन वेड लावलं आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तर हे गाणं रात्री लूपवर ऐकलं असे त्यांनी सांगितलं आहे. हे गाणं योहानीने गायलं आहे. योहानी कोण आहे? असा प्रश्न सगळ्या नेटकऱ्यांना पडला आहे. आज आपण योहानी कोण आहे हे जाणून घेणार आहोत.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या गायिकेला पाहून नेटकऱ्यांना वाटते की योहानी ही दाक्षिणात्य गायिका आहे. मात्र, ही गायिका भारतीय नसून श्रीलंकेची आहे. तिचं सोशल मीडियावर जे गाणं व्हायरल झालं आहे. ते गाणं तामिळ किंवा मल्याळम भाषेत नाही तर सिंहला भाषेत आहे. योहानीचे भारतात लाखो चाहते आहेत. यात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा देखील समावेश आहे. हे गाणं शेअर करत अमिताभ यांनी तिची स्तुती केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी हे गाणं रात्रभर लूपवर ऐकल्याचे त्यांनी सांगितले आहे.