मुंबई - 'झी टीव्ही’वरील लहान मुलांमधील गायनकलेचा शोध घेणाऱ्या ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या रियालिटी कार्यक्रमाने लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा नव्याने स्पर्धेला सुरुवात केली आहे. 18 जुलै रोजी पुन्हा सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा नवा भाग असो की गेल्या वीकेण्डचा पौराणिक विशेष भाग असो, त्यातील गुणी बालस्पर्धकांनी अत्यंत अप्रतिमपणे सादर केलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. पण आता या आठवड्यात प्रेक्षकांना यापेक्षाही अधिक मोठी श्रवणपर्वणी लाभणार आहे, कारण रक्षाबंधनाच्या या विशेष भागात प्रसिध्द कक्कड भावंडे- नेहा कक्कड, टोनी कक्कड आणि सोनू कक्कड- सहभागी होणार असून ते या स्पर्धकांना प्रोत्साहन देतील.
विशेष म्हणजे सोनू कक्कडने या कार्यक्रमात सूत्रसंचालक मनीष पॉलला राखी बांधून त्याला आश्चर्याचा धक्काच दिला! सध्याच्या ‘कोविड-19’ विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेल्या निर्बंधांमुळे अनेक भावा-बहिणींना रक्षाबंधनासाठी एकमेकांची भेट घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे या कार्यक्रमात जेव्हा ही कक्कड भावंडे सहभागी झाली, तेव्हा त्यांनी मनीष पॉलसाठी त्याच्या बहिणीचा विशेष संदेश असलेला एक व्हिडिओ आणि राखी सोबत आणली होती. हा विहिडिओ पाहिल्यावर आपल्याला आपल्या बहिणीची खूप आठवण येत असल्याचे मत मनीषने व्यक्त केले होते आणि तो खूपच उदास झाल्याचे दिसत होते.
मनीषची बहीण ज्योती हिने या व्हिडिओत सांगितले, “मिकी, तू जरी माझा धाकटा भाऊ असलास, तरी तू आजवर माझ्याशी नेहमीच मोठ्या भावासारखा वागलास. माझं लग्न ठरलं, तेव्हा आई-वडिलांबरोबर तूसुध्दा माझ्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली होतीस. यंदा प्रथमच आठ महिन्यांमध्ये आपली भेट झालेली नाही आणि यंदाची राखीपौर्णिमाही तुझ्याशिवायची पहिलीच असेल. पण ती माझ्यासाठी खास असेल, कारण त्या दिवशी तिथीने तुझा वाढदिवसही असतो.” हा व्हिडिओ पाहिल्यावर मनीष पॉल भावनाविवश झाला, तेव्हा सोनू कक्कडने त्याच्या बहिणीच्या वतीने त्याच्या हाताला राखी बांधली.
पण केवळ इतकेच नव्हे, तर कार्यक्रमातील एक परीक्षक असलेल्या जावेद अलीची बहीण तंझीम हिनेही यावेळी त्याला व्हिडिओ दूरध्वनी केला आणि त्याची स्तुती केली. त्यावर जावेद म्हणाला, “आमच्या कुटुंबात आम्ही तिन्ही मुलगेच जन्मलो होतो आणि त्यामुळे चौथ्या वेळी माझ्या आईला मुलगी व्हावी, अशी आम्हा सर्वांची तीव्र इच्छा होती. आम्हाला ही मुलगी बहीण म्हणून मिळाली, याबद्दल आम्ही स्वत:ला सुदैवी मानतो. ती आमच्या कुटुंबासाठी अतिशय भाग्यवान ठरली आहे. कारण ती आमच्या जीवनात आल्यावर सर्व गोष्टी सुरळीत झाल्या.”
हेही वाचा - सोनू सूदने वाढदिवसानिमित्त स्थलांतरीत मजुरांसाठी 3 लाख नोकर्या केल्या जाहीर
नंतर कार्यक्रमात बॉबी आणि सौम्या यांनी जेव्हा ‘फूलों का तारों का सबका कहेना है’ हे गाणे गायले, तेव्हा हिमेश रेशमिया म्हणाला, “तुम्हा मुलांनी मला माझ्या दिवंगत भावाची आठवण करून दिली. मी केवळ 12 वर्षांचा होतो, जेव्हा माझ्या भावाचं निधन झालं. माझ्या चुलत बहिणींनी माझ्यावर खूप प्रेम केलं असलं, तरी कुछ जख्म है, जो भरते नहीं. माझ्या भावाची अनुपस्थिती माझ्यासाठी वेदनामय आहे. मला त्याची खूप आठवण येते.”
आपल्या भावंडांबद्दल बोलताना सोनू कक्कड म्हणाली की नेहा आणि टोनी हे सारखे भांडत असतात आणि मग मला त्यांच्यात मध्यस्थी करावी लागते. टोनीनेही यावेळी सांगितले की नेहा ही त्याची बहीण असल्यापेक्षा मैत्रीणच अधिक आहे. सोनू ही त्या सर्वांची मोठी बहीण आहे. आता कक्कड भावंडे ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे हा रक्षाबंधनाचा विशेष भाग अधिकच संगीतमय झाला आहे. यावेळी काही गुणी लिटल चॅम्प्सकडून अप्रतिम गाणी सादर करण्यात आली. अनन्या आणि रनिता बॅनर्जी यांनी यावेळी नेहा कक्कडचे ‘माही वे’ हे सुपरहिट गाणे सादर केले, तर सक्षम सोनावणेने ‘देवा श्रीगणेशा’ हे गीत आणि एक दमदार पोवाडा खणखणीत आवाजात गाऊन सर्वांची मने जिंकली. एकंदरीतच ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या या भागात प्रेक्षकांच्या अनेक सुखद आठवणी जाग्या होतील आणि सुरेल आवाजातील गाण्यांनी त्यांचे कान तृप्त होतील याची खात्री आहे. हा खास भाग आपल्याला येत्या शनिवारी आणि रविवारी पाहता येणार आहे.