मुंबई -आम्ही जगावं कसं व सरकार या गीतामधून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी कलावंत, सैनिक, पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्या व्यथा सांगणारे एक गाणे तयार केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे.
या गाण्याबाबत आनंद शिंदे म्हणाले, की 'आज कोरोना विषाणूने संपूर्ण जगात, देशात तसेच राज्यात थैमान घातले आहे. यात लॉकडाऊन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कलम 144 अन्वये संचारबंदी कर्फ्यु लागू केले आहे. त्यामुळे सैनिक तसेच गृह विभागाचे पोलीस, होमगार्ड कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तास डोळ्यात तेल ओतून ड्युटी बजावत आहेत. तसेच प्रामुख्याने म्हणजे कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांना कोरोनाच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर, नर्स अहोरात्र क्योरनटाइन कक्ष, विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) मध्ये मेहनत घेत आहेत'.
तर, दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी शहरचा शहर, नगरे, गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करत आहेत. लॉकडाऊन मुळे लावणी, भारूड, वग, लोकसंगित, तमाशा, जागरण गोंधळ व ढोल लेझीम, बॅन्जो पथक, अशा कित्येक प्रकारातून हे कलाकार आपली लोककला सादर करून आपला उदरनिर्वाह करत असतात.