महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘अलबत्या गलबत्या’चा सेट चोरल्याचा श्रेयस तळपदेवर आरोप, राहुल भंडारेंना श्रेयसने दिले सडेतोड उत्तर - Shreyas Talpade had started ‘Nine Rasa’ OTT platform

निर्माते राहुल भंडारे यांनी त्यांच्या अद्वैत थिएटरच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट चोरीला गेल्याची तक्रार मुंबईत शिवडी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेचे नाव गोवले आहे. मात्र श्रेयस तळपदेने राहुल भंडारेंच्या आरोपांचे खंडन करीत सडेतोड उत्तर दिले आहे.

Shreyas Talpade annoyed
श्रेयस तळपदे नाराज

By

Published : Aug 12, 2021, 7:43 PM IST

निर्माते राहुल भंडारे यांनी त्यांच्या अद्वैत थिएटरच्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट चोरीला गेल्याची तक्रार मुंबईत शिवडी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेचे नाव गोवले आहे. त्यांच्या तक्रारीत भंडारे म्हणतात की, ‘कोरोना कालखंडात नाट्यसृष्टीला कुलूप लागले आहे. माझ्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या काळाचौकी येथील गोदामात ठेवलेला होता, ज्याचे भाडेही भरलेले आहे. परंतु भोसले यांना खोटे सांगून श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांनी तो चोरला आणि त्यांच्या ‘भक्षक’ या एकांकिकेच्या चित्रीकरणासाठी वापरला.’ त्यांनी, स्वातंत्रवीर सावरकर नाट्यगृहात याचे बेकायदा चित्रीकरण झाल्याचंही आरोप केला आहे. तसेच त्या एककांकिकेच्या प्रदर्शनावरदेखील आक्षेप नोंदवला असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

श्रेयस तळपदेने सुरू केला होता ‘नाईन रसा’ ओटीटी प्लॅटफॉर्म

श्रेयस तळपदे यांनी रोजंदारी रंगकर्मींना रोजगार मिळावा म्हणून कोरोना काळात ‘नाईन रसा’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु केला जो पूर्णतः नाटकांसाठी समर्पित आहे. ‘भक्षक’ची निर्मिती सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार करीत असून त्यांना या तक्रारीचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले की,’या एकांकिकेचा निर्माता मी आहे हे राहुल भांडारेंना माहित असेलच. त्यामुळे त्यांनी श्रेयस अथवा कोणाचेही नाव घेण्याआधी माझ्याशी संपर्क साधायला हवा होता. तक्रारीत श्रेयस तळपदे यांचे गोवून राहुल भंडारे यांनी प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.’ सध्या नाट्यसृष्टी नाजूक काळातून जात आहे आणि नाटकांशी निगडित सर्वच एक मोठा परिवार आहे. जर कोणाची तक्रार असेल तर आपसात ती सामंजस्याने सोडवायला हवी असेही त्यांचे मत पडले. ‘मी सुरेश सावंत यांना सेट बनविण्यासाठी सांगितले होते आणि मोबदलाही दिला होता. आता ‘अलबत्या गलबत्या’च्या सेटचा काही भाग माझ्या एकांकिकेत वापरला गेला असेल तर तशी मला पूर्वकल्पना नव्हती’, असे शेलार पुढे म्हणाले.

श्रेयस तळपदेने केले राहुल भंडारेंच्या आरोपांचे खंडन

या सर्व प्रकारामुळे श्रेयस तळपदे नाराज असून त्याच्यामते हा ‘चिप पब्लिसिटी’चा भाग आहे. त्याने नाटकाचा सेट चोरी प्रकरणावर ताशेरे ओढले आहेत आणि राहुल भंडारे यांना खरमरीत उत्तर देऊन फटकारले आहे. श्रेयस तळपदे म्हणाला की, “करोना साथीच्या काळात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती रंगभूमी तसेच इतर भाषांमधील आणखी काही रंगभूमींशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक घटकाला आर्थिक पाठबळ देण्याचे काम ‘नाईन रसा’ या माझ्या ओटीटी प्लॅटफॉर्मने काम केले. परंतु, या प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता काही लोकांच्या डोळ्यात आता खुपू लागली आहे. तसा प्रकार नुकताच घडला आहे. नाट्यनिर्माते राहुल मधुकर भंडारे यांनी आपल्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातील सेट चोरीला गेला असून तो आमच्या प्लॅटफॉर्मवरील ‘भक्षक’ नावाच्या एका एकांकिकेत वापरला गेल्याचा आरोप माध्यमांकडे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी थेट माझ्या नावाचा उल्लेख केल्याने त्याबाबत काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे ‘नाइन रसा’वर सादर झालेली विविध भाषांमधील सर्व नाटके किंवा एकांकिकांच्या सादरीकरणाची जबाबदारी व्यावसायिक निर्मात्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्याशी आम्ही एक रितसर करार करतो. त्यामध्ये नाटकाशी संबंधित विविध हक्क तसेच इतर गोष्टींचा समावेश असतो. हे निर्मातेच आपल्या कलाकृतीमध्ये कोणते नेपथ्य वापरायचे आहे, याचा निर्णय घेतात. त्याच्याशी ‘नाइन रसा’ या प्लॅटफॉर्मचा काहीच संबंध नसतो. आमच्या प्लॅटफॉर्मसाठी ‘भक्षक’ या नाटकाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते-अभिनेते सुशांत शेलार यांच्या कंपनीतर्फे करण्यात आलेली आहे. त्यामुळे ‘भक्षक’मध्ये वापरलेला सेट हा नवीन आहे की अन्य कोणाचा आहे, तो आमच्या एकांकिकेत कोठून आला याची मला वैयक्तिकरित्या काहीच कल्पना नाही. त्यामुळे भंडारी यांना सेटबद्दल काही आक्षेप असतील तर त्यांनी आधी या एकांकिकेचे निर्माते सुशांत शेलार यांच्याशी संपर्क साधायला हवा होता. तसे न करता त्यांनी या प्रकाराबद्दल थेट मला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रकार अत्यंत अनुचित आणि माझ्या समाजातील प्रतिमेला धक्का देणारा आहे.

कोरोना काळात रंगकर्मींसाठी श्रेयसने केली रोजगारांची निर्मिती

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आमच्या विविध भाषांमधील कलाकृतींचे चित्रीकरण सुरू आहे. करोना काळात रंगभूमीवरील व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांच्या सादरीकरणाला बंदी असली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही अटी आणि शर्तींसह नाटक-एकांकिकांच्या चित्रीकरणास परवानगी होती. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करूनच आम्ही हे चित्रीकरण केले आहे. त्यासाठी पोलीस, महापालिका आदी यंत्रणांची रितसर परवानगी आम्ही घेतलेली आहे. त्याबद्दलची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तसे आम्ही केले नसते तर सावरकर स्मारकाच्या व्यवस्थापनाने आम्हाला त्यांचे सभागृह चित्रीत करण्याची परवानगी दिली नसती. हे वास्तव असूनही राहुल भंडारी यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे पाठविलेल्या पत्रामध्ये आम्ही सावरकर स्मारकामध्ये बेकायदा चित्रीकरण केल्याचा आणि नियमांचा भंग केल्याचा आरोप केला आहे. हा आरोपदेखील धादांत खोटा आहे. हे सर्व आरोप असूयेपोटी केले असावेत, असे मला वाटते. कारण दीड वर्षांपूर्वी कोरोनाची साथ आल्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती रंगभूमीवरील नाटकांचे प्रयोग बंद झाले होते. त्यामुळे तिथं काम करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ तसेच कामगारांचा रोजगार गेला. अशा विपरित परिस्थितीमध्ये रंगभूमीसाठी गौरवशाली ठरेल अशा ‘नाइन रसा’ या नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मची मी निर्मिती केली. केवळ रंगभूमीला वाहिलेला हा जगामधील एकमेव ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मसाठी आम्ही गेल्या वर्षभरात १०० तासांहून अधिक ‘कॉन्टेन्ट’ चित्रीत केला आहे. तो चित्रीत करण्याच्या निमित्ताने आम्ही निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, कामगार अशा दोन हजारहून अधिक लोकांना रोजगार मिळवून दिला. अनेक नवीन कलाकार, तंत्रज्ञांना आपण या काळात त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी दिली. संपूर्ण रंगभूमी अशी आर्थिक अडचणीत असताना अशा प्रकारे ‘नाइन रसा’द्वारे रंगभूमीशी निगडीत असणाऱ्यांना हात देण्यात आला. तसे करताना आमच्याकडून सर्व अटी, नियम, सूचनांचे पालन करण्यात आले. या सगळ्या मंडळींनी त्याबद्दल ‘नाइन रसा’चे कौतुक केले आहे. आजपर्यंत कोणीही तक्रारीचा सूर आळवलेला नव्हता.

श्रेयस तळपदे नाराज

एवढे सगळे विधायक काम केल्यानंतर अशा प्रकारचे आरोप होणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे नेमके काय घडलेय, याची शहानिशा न करता थेट माझ्यावर असे बिनबुडाचे आरोप करणे, हे योग्य नाही. ‘नाईन रसा’ प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता लक्षात आल्यामुळेच कदाचित ‘चीप पब्लिसिटी’च्या दृष्टीने असे आरोप झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाल्या प्रकाराबाबत भंडारे यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रियेद्वारे मानहानीचा दावा करण्याचाही मी विचार करीत आहे.“

आपले नाव नाहकपणे गोवून अशा प्रकारच्या ‘चिप पब्लिसिटी’ साठी त्याच्या नावाचा गैरवापर केल्याबद्दल श्रेयस तळपदे कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे.

हेही वाचा - अभिनेता प्रकाश राजच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया, सुखरुप असल्याचा चाहत्यांना संदेश

ABOUT THE AUTHOR

...view details