अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक झाल्यानंतर शेट्टी-कुंद्रा परिवारावर टीकेचा भडीमार सुरु झाला होता. मुंबई पोलिसांच्या या कारवाईने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. शिल्पा शेट्टीवर सुद्धा नेटकऱ्यांनी ताशेरे ओढण्यास सुरुवात केली होती आणि जनक्षोभ आपल्याविरुद्ध आहे हे जाणून शिल्पा शेट्टी घराबाहेरसुद्धा पडली नव्हती. डान्स रियालिटी शो सुपर डान्सर मध्ये ती अनुराग बसू आणि गीता कपूर सोबत परीक्षकांची भूमिका पार पाडत होती. परंतु अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे ती नक्कीच भांबावून गेली होती आणि तिने सुपर डान्सर चॅप्टर ४ च्या शूटिंगला दांडी मारली. या कार्यक्रमाच्या पुढील काही भागांमध्ये इतर सेलिब्रिटीजना आमंत्रित करून आयोजकांनी वेळ मारून नेली.
नुकत्याच चित्रपटसृष्टीने कोविडग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये शिल्पाने हजेरी लावली आणि ती आता सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध असल्याची जणू झलक दिली. आता तर शिल्पा शेट्टी थेट सुपर डान्सरच्या सेटवर पोहोचली आणि पुढील भागांच्या चित्रीकरणामध्ये भाग घेतला. काल-परवाच एका मुलाखतीत दिग्दर्शक अनुराग बसू यांनी ‘आम्ही सर्व सुपर डान्सर ची टीम शिल्पा ला मिस करीत आहोत’ असे विधान केले होते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे वाहिनी आणि परीक्षक यांच्या कायदेशीर करार झालेले असतात आणि दोघांकडूनही त्यांचे पालन केले जात असते. अनपेक्षित घटनाक्रमांमुळे काही पर्यायी उपाय योजण्यात आले होते आणि आता राज कुंद्रा ला कोर्टाकडून थोडाफार दिलासा मिळाल्यामुळे शिल्पाने धीटपणे हे पाऊल उचलले असावे.