लवकरच येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी घरोघरी, गल्लोगल्ली, शहरांमध्ये भव्य मंडपांमध्ये गणराय विराजमान होणार आहेत. श्रावण संपून भाद्रपद महिना सुरू झाल्यानं आता संपूर्ण वातावरण आणि सारा आसंमतच जणू गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे. श्रीगणेशाची गीत-संगीताच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी गायक, कलाकार, संगीतकार आणि म्युझिक कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं गणेशाची भक्ती करत आहे. अल्पावधीत रसिकांना सुमधूर अल्बम देणाऱ्या पिकल म्युझिकनं भाद्रपद प्रतिपदेचा मुहूर्त साधत 'गणपती अंगणात नाचतो...' हे नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. आजवर विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेली शीतल अहिरराव 'गणपती अंगणात नाचतो...' या गाण्याच्या निमित्तानं एका वेगळ्याच रूपात दिसते. तिच्या जोडीला संचित चौधरीही लक्ष वेधून घेतो.
यंदाच्या गणेशोत्सवाचं औचित्य साधत पिकल म्युझिक कंपनीनं गणेशभक्तांची आवड लक्षात घेत 'गणपती अंगणात नाचतो...' हे सुमधूर गीत रिलीज केलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये गणरायाची भव्य मूर्ती पहायला मिळते. संचित चौधरी आणि शीतल अहिरराव या नव्या कोऱ्या जोडीवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्याच्या निमित्तानं प्रथमच एकत्र आलेल्या शीतल-संचितच्या नृत्याची जुगलबंदी या गाण्यात आहे. गुलालाची उधळण, गणरायाचा जयघोष, ढोल, ताशे, लेझीम, पखवाज, तुताऱ्यांच्या निनादात श्रीगणेशाचं आगमन होतं आणि त्यानंतर प्रगटणारे भक्तांच्या मनातील भाव या गाण्यात व्यक्त करण्यात आले आहेत. गणेशभक्तीत तल्लीन होऊन भक्त जेव्हा नाचतात, तेव्हा गणपतीही त्यांच्या तालावर नृत्य करतो अशी सुरेख भावना या गाण्याद्वारे सादर करण्यात आली आहे.
गोरक्षनाथ वाघमारे यांनी 'गणपती अंगणात नाचतो...' हे गाणं लिहिलं असून, व्हिडीओचं दिग्दर्शन राज सहाणे यांनी केलं आहे. संगीतकार पी. शंकरम यांनी राधा खुडेसोबत स्वत: हे गीत गायलं आहे. कोरिओग्राफर दिलीप मिस्त्री यांनी या गाण्यावर सुरेख नृत्य दिग्दर्शन केलं आहे. डिओपी विकास सिंह यांनी कॅमेरा हाताळला असून प्रॉड़क्शन मॅनेजर आहेत शिवाजी (मिलिंद) गायकवाड. समीर दीक्षित आणि ह्रषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकची प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती निर्मात्या राखी सुरेश गावडा यांच्या एस. आर. एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली करण्यात आली आहे.