महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

थेट व्यक्त होतो याचा अभिमान आहे - शशांक केतकर - शशांक केतकर स्पष्टवक्ता

'पाहिले न मी तुला' या मालिकेतील शशांक केतकरने साकारलेल्या समर जहागीरदार या खलनायकाच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळतेय. त्याबद्दल विचारले असता शशांक म्हणाला की अभिनेता म्हणून मला विविध भूमिकांतून स्वतःलाच जोखायला आवडते .

Shashank Ketkar
शशांक केतकर

By

Published : Jul 21, 2021, 2:53 PM IST

शशांक केतकर महाराष्ट्राचा ‘श्री’ म्हणून प्रसिद्धीस आला. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर (त्याच्या ‘जान्हवी’ सकट) प्रेम करीत आलाय. त्याने आजवर विविध मालिकांमध्ये नायक म्हणून लोकप्रियता मिळवली. पण सध्या झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' या मालिकेतील त्याने साकारलेल्या समर जहागीरदार या खलनायकाच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळतेय. त्याबद्दल विचारले असता शशांक म्हणाला की अभिनेता म्हणून मला विविध भूमिकांतून स्वतःलाच जोखायला आवडते.

शशांक केतकर

‘पाहिले न मी तुला' या मालिकेत पहिल्यांदाच त्याने खलनायक साकारलाय आणि त्या अनुभवाबद्दल सांगताना शशांक म्हणाला, ‘माझ्यातला अभिनेत्याला वाव मिळण्यासाठी मला काहीतरी वेगळं करायचं होतंच. मला आधीपासूनच खलनायक साकारायचा होता. माझ्यासारख्या आखीव रेखीव चेहरा असणाऱ्याला अभिनेत्याला नायक म्हणूनच काम करावं लागतं की काय अशी मला भीती वाटू लागली होती. मला समर या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मी त्वरीत होकार कळवला.’

खलनायक साकारताना असणाऱ्या आव्हानांबद्दल शशांक म्हणाला की, ‘नाही म्हणायला थोडंफार आव्हानात्मक नक्कीच होत. कारण प्रेक्षक कसे प्रतिसाद देतील हे मनाच्या पाठीशी असतेच. खलनायक किंवा वाईट वागणारी माणसं ही शरीरानेच अवाढव्य वगैरे असतात असं नाही. वाईट वागणं ही एक वृत्ती असते. ही वृत्ती मला साकारायची आहे असा मी विचार केला, त्यामुळे गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या.

शशांक पडद्यावर जरी खलनायकी भूमिका वठवत असला तरी वास्तविक जीवनात तो सोशल मीडियावर मात्र परखडपणे, स्पष्टपणे व्यक्त होऊन सकारात्मकता पसरवतो. ‘सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आहे. तुम्ही योग्य पद्धतीनं, मर्यादीत राहून तिथे व्यक्त होऊ शकता. मी कोणतंही पांघरुण न घालता, गोड गोड न बोलता थेट व्यक्त होतो याचा मला अभिमान आहे. मला उगाचच कौतुक करणं वगैरे आवडत नाही. आपल्या सभोवताली वाईट जगसुद्धा आहे. त्यामुळे जाता जाता माझ्यामुळे एक टक्का जरी सकारात्मकता मी पसरवू शकलो, तर मला ते आवडेल. माझ्या विरोधाभासांचा अर्थ ज्यांना समजतो त्यांना त्यामागचा उद्देशही कळतो.’

शशांक केतकर

खरंतर शशांक केतकर ला नायक म्हणून खूप प्रेम मिळालं, अमाप लोकप्रियता मिळाली. परंतु आपल्या खलनायकामुळे या प्रतिमेला छेद गेला आहे असे त्याला अजिबातच वाटत नाही. तो म्हणाला, ‘प्रेक्षक सुज्ञ आहेत आणि त्यांचे प्रेम नेहमीच उत्साहित करणारे असते. परंतु खलनायक साकारून झाल्यावर मला पुन्हा नायक साकारण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की स्वीकारणार. प्रेक्षकांच्या मनात मी नायक म्हणून कसा आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे तेव्हा ते मला नायक म्हणून निश्चितच स्वीकारतील याची खात्री आहे.’

हेही वाचा - पोर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्रा आणि शर्लिन चोप्रामध्ये झाला होता करार

ABOUT THE AUTHOR

...view details