‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती देशमुख अनेक संकटांना तोंड देत आयुष्य जगतेय. आपल्या नवऱ्यासोबत, अनिरुद्ध देशमुखसोबत, बिघडलेले संबंध असूनही ती देशमुख कुटुंबीयांची अतीव काळजी वाहताना दिसते. देशमुख कुटुंबही अनिरुद्ध ची बाजू न घेता नेहमी अरुंधतीच्या बाजूने उभे राहतात. आता त्यात भर पडणार असून मालिकेत अनिरुद्धच्या भावाची होणार एन्ट्री होणार आहे. अरुंधतीचा दिर अविनाश देशमुख एन्ट्री घेताना दिसेल. मालिकेत आजवर या पात्राविषयी आपण ऐकत आलोय. पण आता अविनाश देशमुखांच्या घरात दाखल होणार आहे. या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे बहुगुणी अभिनेता शंतनू मोघे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच अनिरुद्ध देशमुखचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एन्ट्री होणार आहे आणि त्याबद्दल सांगताना शंतनू म्हणाला, ‘आई कुठे काय करते च्या टीममध्ये मी जरी नवा असलो तरी मला तसं कुणी जाणवू दिलं नाही. खूप प्रेमाने माझं स्वागत झालं. या मालिकेचा मी मोठा चाहता आहे आणि माझ्या घरातल्या सर्वांचीच ही आवडती मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत काम करायला मिळणं हे प्रचंड मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. मालिकेची टीम अतिशय भन्नाट आहे.’
आई कुठे काय करते मालिका सध्या भावनिक वळणावर आहे. अनिरुद्ध अरुंधतीच्या नात्याची वीण उसवल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबाला मानसिक आधाराची गरज आहे. अविनाश कुटुंबाचा आधार होईल का आणि त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं वळण येणार हे पुढील भागांमधून स्पष्ट होईल.