एकत्र कुटुंबपद्धती जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. त्यामुळे घरातील मुलांना जेष्ठांकडून संस्कारांचे धडे मिळणे मुश्किल झाले आहे. आई-वडील सतत कामाच्या ओझ्याखाली असल्यामुळे मुलांवर हवे तसे संस्कार होण्यात कमतरता भासतेय. परंतु मराठी मालिकांमधून मराठी परंपरा आणि संस्कार यावर भर दिला जातो आणि म्हणूनच कदाचित ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतील तात्या आजोबा लहान मुलांचे आवडते झालेत.
झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील एक व्यक्तिरेखा म्हणजे तात्या आजोबांची. ही भूमिका जेष्ठ अभिनेते सी.एल. कुलकर्णी अगदी चोख निभावत आहेत. असे आजोबा आपल्या कुटुंबात देखील हवे हे अनेकांना मालिका पाहताना प्रकर्षाने जाणवतं.
त्यांच्या या लोकप्रिय भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, "तात्या म्हणजे एक रसिक, सुजाण, समंजस, कर्तृत्ववान, परंतु कुटुंबवत्सल, चुकीला चूक मानणारं, वेळ पडल्यास आनंदाने निसंकोचपणे शरण जाणारं निर्मळ व्यक्तिमत्व. साधी राहणी, उच्च विचारसरणी हा त्या व्यक्तिमत्वाचा गाभा. कुठल्याही बाबीचा सर्वांकष विचार करून, नीरक्षीर विवेकाने अडचणींवर मात करून कोणालाही न दुखावता सकारात्मक तोडगा काढण्याचा त्यांचा स्वभाव. सामाजिक दायित्वाची जाण असणारा, एकजुटीचं महत्व जाणणारा, घरात धाक पण तरीही अतिरेकी जाच नसणारा, विचारी, विवेकी, चांगल्या गोष्टींना मनापासून दाद देणारा, खेळकर, आनंदी, प्रगतिशील आणि आदर्श माणूस. कोणालाही हवीहवीशी आणि आपलीशी वाटणारी अशी ही व्यक्तिरेखा, विशेतः लहान मुलांना हे तात्या आजोबा फार आवडतात हे लक्षात आलंय माझ्या."
नाती जोडून ठेवण्यासाठी कुलकर्णी काकांनी एक मोलाचा सल्ला दिला तो म्हणजे, "समाज सौष्ठवासाठी आधी कुटुंब बांधता आलं पाहिजे. आपण प्रत्येकासाठी आहोत आणि प्रत्येकजण आपला आहे ही भावना हा त्यासाठी एक महत्वाचा धागा आहे. माणूस हा त्याच्या गुणदोषांसहित स्वीकारावा लागतो. हे सगळं या मालिकेतून अतिशय उत्तमरीत्या दाखवलं आहे त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना देखील आवडतेय याचा मला आनंद आहे."
त्यांच्या या विचारसरणीमुळेच कदाचित ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील तात्या आजोबा बच्चेकंपनीचे ‘फेवरेट’ बनले आहेत.
हेही वाचा -राज कुंद्राने शिल्पा शेट्टीच्या नावावर केले 38 कोटीचे 5 फ्लॅट्स