महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तमाशा कलावंतांचे हाल पाहून सेन्ट्रींग कामगाराने पाठवली ८ हजारांची मदत - workers of Walva helped the Tamasha artists

कोरोनामुळे सगळ्या जगाचा वेग कमी झालाय. आर्थिक गणिते बिघडली आहे. धंदा, व्यवसाय मोडकळीस आलेत. गेली वर्षभर जत्रा, यात्रा बंद असल्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे विशेषतः तमाशा कलावंतांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा वेळी शासनाने लोककलावंतांना मदत करण्याची गरज आहे. मध्यंतर एका मुलाखतीत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी लोककलाकारांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद वाळवा गावातील सेन्ट्रींगचे काम करणाऱ्या राहुल भागवत जाधव या युवकाने दिला व ८ हजार रुपयांची मदत त्याने पाठवली. स्वतः रघुवीर खेडकर यांनी फोन करुन राहुले आभार मानले आहेत.

Helping Tamasha artists
तमाशा कलावंतांना मदत

By

Published : Jun 4, 2021, 7:47 PM IST

वाळवा (सांगली) - महाराष्ट्रात तमाशाचा फड झाला नाही असे गाव सापडणार नाही. वाळवा गाव तसे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी व उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. इथे कुस्तीच्या फडाबरोबर तमाशाचेही फड येथे रंगतात. गावात खूप लोक कलाकार आहेत. लोककलांना इथे मानसन्मान दिला जातो.अशाच काही लोककलांचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांचा वाळव्यातील एका युवकाने योग्य व यथोचित मानसन्मान केला आहे.

राहुल भागवत जाधव रा. वाळवा (कोटभाग) हा सेन्ट्रीगचे काम करतोय. साधारणपणे गावातच काम चालू असल्याने दररोज घरी दुपारी १ वा.जेवायला येत असतो. नेमके त्याच वेळी टीव्हीवर लोक कलाकार तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे या दोघांची मुलाखत चालू होती. राहुलच्या वडिलांनी ही मुलाखत घरातील सर्वाना सोबत घेऊन पाहिली. राहुलच्या वडिलांनाही पूर्वी तमाशाचे खूप वेड होते. त्या वेडापायीच त्यांनी ही मुलाखत पहिली. मुलाखतीच्या दरम्यान खेडकर व मंगला बनसोडे यांनी सध्या खूप अडचणी आहेत असे सांगितले. ते असेही म्हणाले की आम्हाला १०० ते १२५ लोकांचे कुटुंब जगवायचे आहे. कोरोनामुळे सगळंच उध्वस्त झालंय. कदाचित तमाशाचे फडदेखील बंद होतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अडचणींचा ससेमिराच मागे लागला आहे. कामगारांचे पगार राहिलेत. गाडीचे पेट्रोल आहे, गाडी जाग्यावरच असल्यामुळे गाडी व वेगवेगळे तमाशाचे कपडे, साहित्य खराब व्हायला लागले आहेत. यात्रा,जत्रा सगळे कार्यक्रम रद्द झालेत. जगायचे कसे व खायचे काय हा सगळ्यात मोट्ठा प्रश्न आ वासून उभा आहे.

मुलाखतीच्या दरम्यान त्या दोन तमाशावीरांना अश्रू अनावर झाले. ज्या दोन तमाशा कलावंतांनी संपूर्ण महाराष्ट्राला हसवले आज त्याच कलावंतांच्यावर ही काय वेळ आली आहे. मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला मदतीचे आव्हान केले होते. बँक ऑफ महाराष्ट्रचा जॉईंट अकाउंट खाते नंबर व दोघांचे फोन नंबर दिले होते. तमाशापायी आपल्या आयुष्याची राख-रांगोळी झालेली माणसं पहिली आहेत. पण हा राहुल झाव सारखा एक युवक आज तमाशा जिवंत राहिला पाहिजे म्हणून मदत करतोय. तेही कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा न करता आणि स्वतःच्या आयुष्याचा तमाशा न करता.

तमाशा कलावंतांचे हाल पाहून सेन्ट्रींग कामगाराने पाठवली ८ हजारांची मदत

मुलाखत पाहत असताना राहुलच्या वडिलांच्या व घरातल्यांच्या देखील डोळ्यात अश्रू आले होते. त्यावेळी वडिलांनी एक निर्णय घेतला की यांना मदत करायची. राहुलला म्हणाले की मला प्रत्येकी एक हजार द्यायचे. ते असेही म्हणाले की २०१९ ला ज्यावेळी आपल्या गावाला महापूर आला होता त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या गावाला मदत केली होती. याची जाणीव ठेवून आज त्याची परतफेड करायची वेळ आली आहे. आई-वडील, पत्नी व तीन मुलींसोबत राहुल हा संसाराचा गाडा ओढतोय. खरं तर मुली अजून लहान आहेत. त्यांचे शिक्षण, कपडेलत्ते, लग्न व भविष्यातील अडचणींचा विचार करून राहुलने मदत करायचे ठरवले. पहिली पाच हजाराची मदत त्याने पत्रकार धन्वंतरी परदेशी व बाकीची तीन हजाराची मदत पत्रकार शैलेंद्र हवलदार यांच्याकडे दिली होती. आज त्यांची आठ हजाराची मदत मैलाचा दगड ठरली आहे. खुद्द रघुवीर खेडकर यांनी स्वतः फोन करून राहूलचे आभार मानले.

आज गावात खूप मोठी राजकारणी, कारखानदार, लक्षाधीश, कोट्याधीश, दानशूर लोकं आहेत. लाखो रुपयांचा गाड्या आहेत. खूप मोठ्या मोठ्या संस्थादेखील आहेत. खूप मोठ्या पदावरदेखील लोक आहेत.पण मदतीची उर्मी मनातूनच यावी लागते. सर्व अडचणींवर मात करून मदत करायची हिम्मत आज कुणाच्यातही नाही. ती राहुलने दाखवली आहे. दहा बाय तीस फूट लांबीच्या घरात राहून देखील आज राहूलने जे औदार्य दाखवले आहे. त्याला तोड नाही.गावात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.अजूनही त्यांना काही मदत लागली तर मदत करायची,असेही तो म्हणाला. राहुलकडून प्रेरणा घेऊन दोन तीन युवक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. तुटपुंज्या पगारातसुद्धा केलेल्या मदतीमुळे त्याचे कौतुक होत आहे. आज तो समाजातील युवकांचा आदर्श ठरत आहे.

हेही वाचा - HBD अशोक सराफ : रंगभूमीवरचा 'विदुषक' बनला चित्रपटसृष्टीचा 'मामा'!!

ABOUT THE AUTHOR

...view details