स्टार प्रवाहवरील गाजलेली अग्निहोत्र या मालिकेचं दुसरं पर्व येत्या २ डिसेंबरपासून रात्री १० वाजता सुरु होतंय. मालिकेच्या टीझरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता या मालिकेच्या नव्या प्रोमोने मालिकेविषयीची उत्सुकता आणखी वाढवलीय. दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे यांच्यासोबत रश्मी अनपट या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. तब्बल २ वर्षांनंतर रश्मी ‘अग्निहोत्र २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती अक्षरा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
अग्निहोत्र या मालिकेचं दुसरं पर्व या भूमिकेविषयी सांगताना रश्मी म्हणाली, ‘अग्निहोत्र २ मध्ये काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. या मालिकेत मी अक्षरा ही व्यक्तिरेखा साकारतेय. अतिशय शांत, साधी सरळ आणि आपल्या तत्वांशी ठाम असणारी ही मुलगी आहे. अक्षराच्या वडिलांच्या बाबतीत एक घटना घडलीय ज्याचा संबंध वाड्याशी आहे. अक्षराला पडलेल्या याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी ती अग्निहोत्री वाड्यात येणार आहे. ही गोष्ट नव्या पीढीची असल्यामुळे पहिलं पर्व जरी प्रेक्षकांनी पाहिलेलं नसलं तरी हरकत नाही. ‘अग्निहोत्र २’ ची गोष्ट आणि त्यातली अनेक रहस्य तुम्हाला नक्कीच आवडतील.’
आजही अग्निहोत्र मालिकेविषयी आणि मालिकेतल्या पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये जिव्हाळा आहे. पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नव्या पीढीची नवी गोष्ट आणि सप्तमातृकांचं रहस्य उलगडेल. या सप्तमातृकांच्या रुपात दिसतील सात अभिनेत्री. या सात अभिनेत्रींपैकी एक असेल अक्षरा म्हणजेच रश्मी अनपट. पहिल्या पर्वात महादेव अग्निहोत्रींची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी साकारली होती. आजारावर मात करत ‘अग्निहोत्र २’ मध्येही शरद पोंक्षे त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज आहेत. अग्निहोत्र १ चे दिग्दर्शन अभिनेते-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केले होते. योगायोगाने सतीश राजवाडे स्टार प्रवाह वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख म्हणून सध्या जबाबदारी सांभाळत आहेत. ‘अग्निहोत्र २’ची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
अग्निहोत्र धगधगतं ठेवण्यात नवी पीढी यशस्वी होणार का? काय असेल सप्तमातृका आणि नाशिकच्या वाड्याचं रहस्य? या आणि अश्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा ‘अग्निहोत्र २’ मधून होईल.