मुंबई - अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या मुख्य भूमिका असलेला 'बदला' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.०४ कोटींची कमाई केली होती. आता दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.
'बदला' चित्रपट एक सस्पेन्सपट आहे. या चित्रपटात तापसी आणि अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिकांचे कौतुक केले जात आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली असुन ८.५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. दोनच दिवसात या चित्रपटाने १३.५९ कोटींपर्यंत मजल मारली आहे.
'बदला' चित्रपटाला टक्कर देण्यासाठी हॉलिवूडचा 'कॅप्टन मार्व्हल' हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्हीही चित्रपटांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
अमिताभ बच्चन यामध्ये वकिलाच्या भूमिकेत आहेत. याआधीही तापसी आणि अमिताभ यांनी 'पिंक' चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातही अमिताभ वकिलाच्या भूमिकेत होते.
'पिंक'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४.३२ कोटींची कमाई केली होती. पिंकच्या तुलनेत बदला चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती गल्ला जमवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
'बदला' चित्रपट शाहरुखच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट'ने प्रोड्युस केला आहे.