मुंबई - ‘कलाश्रम’ या संस्थेच्यावतीने जानेवारी महिन्यातील दिग्गज दिवंगत व्यक्तीला प्रत्यक्ष कलाकृतीतून आदरांजली वाहिली जाते. या महिन्यात कवी, लेखक नामदेव ढसाळ यांना गायक, गीतकार सतीशचंद्र मोरे ‘स्वरमयी आदरांजली’ वाहणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम अपराज, दखलपत्राचे वाचन शैलेश निवाते, मोनाली घोलप, निलेश नाईक, लक्ष्मी कुशाले हे कलाश्रमचे सदस्य करणार आहेत. आदर्श शिक्षिका सुविद्या तळेकर यांच्या नावाने ‘माँ तुझे सलाम’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी होणार आहे. शोभा गांगण आणि विभावरी खरडे हे विजयी स्पर्धक आहेत.
स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील यांच्या कलाकेंद्र अंतर्गत कार्य करणार्या ‘कलाश्रम’ या संस्थेच्यावतीने ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम प्रत्येक महिन्याला आयोजित करण्यात येतो. शुक्रवार २८ जानेवारी २०२२ सायंकाळी ७ वाजता होणारा कार्यक्रम हा संस्थेचे बेचाळीसावे पुष्प असून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी इथे होणार आहे. लेखक, दिग्दर्शक कुमार सोहनी प्रमुख पाहुणे असून त्यांच्या हस्ते ‘कणखर’ पुस्तकाचे प्रकाशन आणि दखलपत्रांचे वितरण होणार आहे.