मुंबई- ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत एक नवा अध्याय सुरू होणार आहे. काही महिन्यांपूर्वी रणजितने संजूकडून एक वचन घेतले होते, की ढालेपाटलांच्या दारात पुन्हाएकदा लाल दिव्याची गाडी यावी. आणि रणजीतचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी संजूने घेतली होती. रणजीत आणि संजूमध्ये काही काळ दुरावा देखील आला पण तरीदेखील तिने धीर सोडला नाही. तिच्यासमोर एक ध्येय होते रणजीत यांना दिलेले वचन पूर्ण करणे.
आता संजू आणि रणजीतच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाणार आहे. तिच्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या तर काही आणल्या गेल्या. राजश्रीने घडवून आणलेल्या अडचणींवर देखील मात करत संजूची जिद्द, निर्धार तितकाच खंबीर राहिला. आणि आता तो दिवस आला आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. संजू अखेर पोलीस वर्दीमध्ये रणजीत समोर येणार आणि अखेर रणजीतचे स्वप्न पूर्ण करणार आहे. ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेच्या विशेष भागात संजू म्हणजेच रणजीतच्या फौजदारीणबाईची धम्माकेदार एंट्री होणार आहे.