सध्या सर्व ठिकाणी वेब सिरीज चा बोलबाला आहे. हिंदीत अनेक नामचीन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार वेब सिरीज कडे वळताना दिसताहेत. मराठीतही अनेक वेब सिरीज बनत असून आता ‘दुनियादारी’ फेम संजय जाधव एक सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीज बनवतोय ज्याचे नाव आहे ‘अनुराधा’. याची निर्मिती प्लॅनेट मराठी'ची असून तिचे नुकतेच चित्रीकरण सुरु झाले. नजीकच्या काळात प्लॅनेट मराठी अनेक प्रोजेक्ट्स वर काम करीत असून ‘अनुराधा’ त्यातीलच एक आहे. त्यांची पहिली वेब फिल्म ‘जून’ या महिन्याच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शित होत आहे.
संजय जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘खारी बिस्कीट’ चित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते आणि ते आता वेब सिरीजचं दिग्दर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ या वेबसिरीजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सचित पाटील, विद्याधर जोशी, सुशांत शेलार, सुकन्या कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर संजय जाधव 'अनुराधा'च्या निमित्ताने प्रथमच वेबसिरीजचे दिग्दर्शन करत आहेत.
तेजस्विनी पंडित आणि संजय जाधव हे ‘ये रे ये रे पैसा’ वेळी एकत्र आले होते आणि आता ‘अनुराधा’ निमित्त पुन्हा एकत्र आल्याबद्दल संजय म्हणाला, 'एक सांगेन की, ही एक सस्पेन्स थ्रिलर असून माझ्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन प्रथमच काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे तो म्हणजे माझी पहिली वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी' सारख्या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजबद्दल मी आता जास्त काही सांगणार नाही पण ती नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे.’