सोनी वाहिनीवरील इंडियन आयडॉल १२ मधील गायक स्पर्धक अत्युच्य पातळीची गायकी पेश करीत परीक्षकांबरोबरच कार्यक्रमात येणाऱ्या विविध सेलेब्रिटी पाहुण्यांनाही चकित करीत आहेत. परंतु या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलचा मंच आजवर कधी झाला नसेल, इतका आध्यात्मिक आणि मनःशांती प्रदान करणारा असेल, कारण स्पर्धक राष्ट्रीय टेलिव्हिजनवर रामायण कथन करणार आहेत. हे निरूपण सांगीतिक असेल आणि त्याने रामनवमीचा भाग अधिक विशेष बनेल. त्यात या भागाला चार चाँद लावण्यासाठी बाबा रामदेव यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे. बाबा रामदेव त्यांच्या संन्यासाबद्दलची गोष्टसुद्धा या भागात कथन करतील.
रामनवमीच्या मंगल प्रसंगी, इंडियन आयडॉलचे स्पर्धक काही सुमधुर गाणी म्हणणार आहेत, जी ऐकून सगळे परीक्षक भक्तीत लीन होऊन जातील आणि सेटवर उपस्थित सगळ्यांनाच मनःशांतीचा अनुभव मिळेल. योग गुरु देखील स्पर्धकांच्या गोड गळ्याच्या गायकीचा आस्वाद घेताना दिसले. इतकेच नाही, तर त्यांनी हे देखील उघड केले की, रामनवमीच्या दिवशीच त्यांनी जीवनातील ऐहिक सुखांचा त्याग करून संन्यास घेण्याचे ठरवले होते.