मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'बिग बॉस'चा १३ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वादग्रस्त आणि नवनवीन ट्विस्ट्सने भरलेला हा शो टीआरपीमध्येही अव्वल असतो. त्यामुळे प्रेक्षकांनाही या शोमध्ये काय नवीन घडणार, याची उत्सुकता असते. नुकताच या शोचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच हा शो केव्हा प्रदर्शित होणार याचाही खुलासा या प्रोमोतून करण्यात आलाय.
सलमान खान या प्रोमोमध्ये शेफच्या अवतारात पाहायला मिळतो. किचनमध्ये तो खिचडी बनवताना बिग बॉसच्या १३ व्या पर्वात काय काय घडणार, याबद्दल हिंट देताना दिसतो. २९ सप्टेंबर पासून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
कलर्स वाहिनीच्या ट्विटर अकाऊंटवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. २९ सप्टेंबरपासून पहिल्या दिवशी रात्री ९ वाजता या शोची सुरुवात होणार आहे. तर, सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे.