‘सैराट’ भन्नाट चालला आणि १०० कोटी कमावणारा पहिला मराठी चित्रपट ठरला. मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ही प्रेमी-जोडी प्रसिद्ध झालीच परंतु या चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका करणारे कलाकारदेखील नावारूपास आले. या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात परश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाही आहेत. हीच जोडी आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
मोठ्या पडद्यावर गाजलेली बाळ्या आणि सल्याची जोडी आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. झी मराठीवरील आगामी मालिका ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दलची माहिती अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. बाळ्या आणि सल्या म्हणजेच अनुक्रमे तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख आता टेलिव्हिजन मालिकेतून सर्वांना रिझवतील.