लॉकडाऊन मध्ये जेव्हा संपूर्ण मनोरंजनसृष्टी ठप्प झाली होती तेव्हा फक्त म्युझिक इंडस्त्री घरात बसून आपले काम करीत होती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना म्युझिक सिंगल्स भरपूर प्रमाणात येताना दिसत आहेत. नुकतंच एक फ्रेश आणि रोमँटिक मराठी गाणं रसिकांच्या सेवेत रुजू झालं ते म्हणजे ‘प्रेम माझं माऊथफ्रेशनर'. यात अभिनेत्री पूर्वा शिंदे आणि गायक वैभव लोंढे यांची रोमँटिक केमिस्ट्री बघायला मिळत असून हे जबरदस्त सॉंग 'पीबीए म्युझिक' अंतर्गत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. पीबीए म्युझिकने या आधी 'विठ्ठला विठ्ठला', 'नखरा', 'हे गणराया', 'पैंजण तुझं' या गाण्यातून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
'जीव माझा गुंतला', 'लागीर झालं जी' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे कायमच तिच्या हटके आणि दमदार भूमिकांमुळे चर्चेत राहिली आहे. तर अभिनेता, संगीतकार, गायक म्हणून वैभव लोंढेने नेहमीच वेगवेगळ्या गाण्यांमधून आपली जागा रसिक प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली. पूर्वा आणि वैभवची जोडी 'प्रेम माझं माऊथफ्रेशनर' या सॉंग मधून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पूर्वाच्या नृत्याविष्काराने या गाण्याची शोभा वाढविली असून या सॉंगचा जलवा नक्कीच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यांत शंकाच नाही. निर्माते अँजेला आणि तेजस भालेराव यांच्या पीबीए फिल्म्स अँड म्युझिक निर्मित हे गाणे असून वैभव ने या गाण्यात अनेकविध जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पेलवल्या आहेत.