मुंबई- अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी कलर्सवरील 'खतरों के खिलाडी’ चे सूत्रसंचालन करतो. त्याला स्वतःला ॲक्शन बॅकग्राउंड आहे (त्याचे आई-वडील दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डिरेक्टर राहिले आहेत) आणि त्याच्याबद्दल स्पर्धकांमध्ये भीतीयुक्त आदरही आहे. बॉलिवूडमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेला रोहित शेट्टी 'खतरों के खिलाडी’ मधील बरेचसे स्टंट्स स्वतः करून बघतो त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो. आता हा ॲक्शन-मास्टर पुन्हा एकदा घेऊन आलाय थरारक मनोरंजन 'खतरों के खिलाडी’ च्या ११ व्या पर्वातून.
अभूतपूर्व रोमांच, साहसी व धाडसी कृत्ये हे 'खतरों के खिलाडी’चे वैशिष्ट्य आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ॲक्शन्ड-पॅक्ड प्रोमोमध्ये ॲक्शन-मास्टर रोहित शेट्टीने या शोच्या शुभारंभाचे संकेत दिले आहे. केपटाऊनमधील नयनरम्य ठिकाणांवर हे धोकादायक खेळ खेळले जाणार आहेत. दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटीज या शोचा हिस्सा होत असतात आणि यावेळीही नावाजलेले स्पर्धक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. यातील १३ साहसी स्पर्धक-योद्धे खंबीरपणे त्यांच्या भयावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. शोची यावेळची टॅगलाईन आहे ‘डर वि डेअर’ (Darr vs Dare). 'डर और डेअर का बॅटलग्राऊण्ड, वेलकम टू केपटाऊन' थीम असलेल्या या नवीन पर्वामध्ये काही अभूतपूर्व साहसी स्टण्ट्स आणि स्पर्धकांच्या भयाचा सामना करण्याची हिंमत पाहायला मिळणार आहे.