मुंबई -बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार ऋषी कपूर गेल्या आठ महिन्यांपासून न्यूयॉर्क येथे कॅन्सरवर उपचार घेत होते. त्यांच्या आजाराचा कोणताही खुलासा न करता ते अमेरिकेत उपचारासाठी रवाना झाले होते. ते आता कॅन्सरमधुन बरे झाले आहेत. मात्र, काही तपासण्यांसाठी त्यांना तिथे थांबावे लागणार आहे. आता ऋषी कपूर यांना घराची ओढ लागली आहे. आता कधी एकदा घरी जातो, असे त्यांना वाटत आहे.
ऋषी कपूर यांच्या आजाराविषयी बरेच महिने गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, नीतू कपूर यांनी दिवाळीच्या दरम्यान केलेल्या एका पोस्टनंतर त्यांना कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले होते. या दरम्यान बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली. गेल्या ८ महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते आता घरी जाण्यासाठी आतुर झाले आहेत. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
आत्तापर्यंत अक्षय कुमार, शाहरुख खान, दीपिका पदुकोन, प्रियांका चोप्रा, सोनाली बेंद्रे, अनुपम खेर, बोमण ईरानी, विकी कौशल आणि बऱ्याच कलाकारांनी न्यूयॉर्कला जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली. उद्योगपती अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांनीदेखील त्यांच्या पत्नीसह त्यांची भेट घेतली. आता ऋषी कपूर भारतात कधी परतात याची चाहत्यांना आतुरता आहे.
मागच्या वर्षी बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. सोनाली बेंद्रे, इरफान खान, ताहिरा कश्यप यांच्या कॅन्सरचे वृत्त समोर आल्याने कलाविश्वात खळबळ उडाली होती. त्यानंतर ऋषी कपूर यांनाही कॅन्सरचे निदान झाले. सोनाली बेंद्रे देखील न्यूयॉर्कमधुनच कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतली आहे. तर इरफाननेही भारतात परतताच कामाला सुरुवात केली आहे. त्याचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.