मुंबई - अभिनेता रणवीर सिंग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. २०१९ च्या सुरुवातीलाच त्याचा 'सिम्बा' चित्रपट सुपरहिट ठरला. तर 'गली बॉय' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम केले. या चित्रपटातून त्याच्या रॅप गाण्याचं टॅलेन्टही जगासमोर आलं.
त्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आता तर खुद्द ए. आर. रेहमान हे देखील रणवीरसोबत एका प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत. त्यामुळे रणवीर सिंगचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
ए. आर. रेहमान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. रणवीर सिंगचेही हे स्वप्न होते. त्याचे हेच स्वप्न सत्यात उतरणार आहे. अलिकडेच रणवीरने 'इन्क्लिंच' या म्युझिक कंपनीची जबाबदारी हाती घेतली आहे. या म्युझिक लेबलअंतर्गत नवनव्या कलाकारांना संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी ए. आर. रेहमानसोबत मिळून तो एका प्रोजेक्टसाठी काम करणार आहे. त्यासाठी ए. आर. रेहमान रणवीरला भेटण्यासाठी येणार आहेत. त्यांनी ट्विटरवर रणवीरला हा संदेश पाठविला होता. त्यांचा संदेश पाहून रणवीरने आनंदाने उड्या मारल्या.
अलिकडेच एका माध्यमाच्या मुलाखतीत रणवीरने दीपिकाच्या गायनाबद्दलही संवाद साधला होता. दीपिका ही देखील खूप चांगली गायिका आहे. मात्र, ती फक्त माझ्याचसाठी गाणं म्हणते, असे त्याने सांगितले होते.
सध्या रणवीर सिंग त्याच्या आगामी '८३' या चित्रपटात व्यग्र आहे. करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटातही तो महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच त्याला फिल्मफेअरच्या समीक्षक श्रेणीमध्ये 'पद्मावत' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.