मुंबई -बॉलिवूडची 'ड्रामा क्विन' राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीझोतात येत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिचे लग्न. होय तिच्या लग्नाच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. तिचे ब्रायडल लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून राखीने लग्न केले की काय? असे प्रश्न चाहते विचारत आहेत.
राखीने एका एनआरआय व्यक्तीसोबत गुप्तपणे लग्नगाठ बांधली असल्याच्या चर्चा अलिकडेच सोशल मीडियावर रंगल्या होत्या. एवढंच काय तर मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये तिचा विवाह सोहळा पार पडल्याचेही बोलले गेले. मात्र, याबाबत राखीने आता स्वत:च एक खुलासा केला आहे.