मुंबई - सुपरस्टार रजनीकांत हे लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील लोकप्रिय असलेल्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या एका भागामध्ये बियर ग्रीलसोबत दिसणार आहेत. मागच्या वर्षी त्यांनी या भागाचे शूटिंगही पूर्ण केले. बियर ग्रील आणि रजनीकांत एकत्र जंगलसफारी करताना दिसणार असल्यामुळे चाहत्यांनाही या आगामी भागाची उत्सुकता आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रजनीकांत यांची दमदार झलक पाहायला मिळते.
'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या या प्रोमोमध्ये रजनीकांत हे जंगलाच्या रस्त्यावर बाईक राईड करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे हे साहसी दृश्य पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मात्र, त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण या कार्यक्रमाचा हा आगामी भाग २३ मार्च रोजी ८ वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे.