सोनी मराठी वाहिनीवर सिंगिंग स्टार हा नवीन कार्यक्रम सुरु होत आहे. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे म्हणतं ऑगस्ट महिन्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्येकाच्या मनात एक गाणं असत, गाणं गुणगुणऱ्या या ताऱ्यांच्या मनातलं गाणं ओठांवर आणायचा हा वाहिनीचा प्रयत्न आहे.
प्रशांत दामले, बेला शेंडे आणि सलील कुलकर्णी करणार 'सिंगिंग स्टार' शोचे परीक्षण - सिंगिंग स्टार हा नवा कार्यक्रम
सिंगिंग स्टार हा नवा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे. ऋता दुर्गुळे याचे सूत्रसंचालन करेल तर प्रशांत दामले, बेला शेंडे आणि डॉ. सलील कुलकर्णी याचे परिक्षण करणार आहेत. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा शोमध्ये सहभाग असेल.
या कार्यक्रमात गाणारे तारे हे काही पेशाने गायक नाहीत पण त्यांना गाण्याची आवड आहे, नेहमीच्या कामातून वेळ काढून गाणं होत नाही, पण त्यांची गाण्याशी नाळ तुटलेली नाही आणि म्हणूनच या मंचावर ते आपल्या मनातलं गाणं ओठांवर आणायचा आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा प्रयत्न करणार आहेत. कार्यक्रमाचं सूत्र संचालन करण्याची जबाबदारी पार पडायला महाराष्ट्राचा लाडका आणि ग्लॅमरस असा चेहरा म्हणजे ऋता दुर्गुळे हिची निवड करण्यात आली. या कार्यक्रमचे परीक्षक म्हणून ज्यांचं लिमका बुक रेकॉर्ड्स मध्ये नाव असलेले, स्वतः उत्तम गायक,अभिनेते व निर्माते असलेले प्रशांत दामले, स्वतःच्या गोड आवाजाने अनेक अभिनेत्रींना आवाज दिलेली राष्ट्रीय पुरस्कार विजेती बेला शेंडे आहे, आणि गीतकार-गायक ज्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या 'आयुष्यात' आपलं असं स्थान निर्माण केलं आहे असे डॉ. सलील कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व ताऱ्यांना गाणे शिकवण्यासाठी आणि त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी संगीतात निपुण असेलेले काही मार्गदर्शक निवडले गेले आणि तारे आणि मार्गदर्शक अशा जोड्या करण्यात आल्या. प्रेक्षकांचे अनेक लाडके तारे आणि गायक २१ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सोनी मराठी वाहिनीचा हा पहिलाच सिंगिंग शो असणार असून त्याद्वारे एक नवीन संकल्पना मांडण्याचा प्रयत्न वहिनीने केला आहे. कोण कोण कलाकार असणार सहभागी..? अभिनेता आणि गायक अजय पुरकर, अभिनेत्री अर्चना निपाणकर, अस्ताद काळे, गिरीजा ओक, स्वानंदी टिळेकर, पौर्णिमा डे असे काही कलाकार या सिंगिंग रिऍलिटी शोमध्ये आपली कला दाखवून देतील. तर रोहित राऊत, वैशाली भैसने -माडे, सावनी रवींद्र, अमृता नातू, राहुल सक्सेना असे काही आघाडीची गायक मंडळी त्याना मार्गदर्शन करताना दिसतील.