संगीत आणि गुरु हे समीकरण वर्षानुवर्षे अबाधित आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या संगीत रियालिटी शोवर थोडीफार टीका होत असली तरी बहुतांश प्रेक्षकांना तो आवडतोय. या शोमध्ये एका तपापूर्वी जे शिष्य होते ते आता गुरु म्हणून परीक्षकांच्या खुर्चीवर बसताना दिसताहेत. या कार्यक्रमातील छोट्या शिष्यांना ते गुरुस्थानीच आहेत. येत्या आठवड्यात प्रेक्षक सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये गुरुपौर्णिमा विशेष भाग पाहू शकतील. इतकंच नव्हे तर हा विशेष भाग नवीन मंचावर होणार आहे. या भागाची सुरुवात पंचरत्न आणि सर्व लिटिल चॅम्प्सच्या दमदार परफॉर्मन्सने होणार आहे. या भागात सर्व लिटिल चॅम्प्स आपल्या गुरूला गाणं डेडिकेट करतील.
झी मराठीवर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून १४ अफलातून लिटिल चॅम्प्स आणि त्यांचे भन्नाट सादरीकरण अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना थक्क करत आले आहेत. या प्रतिभावान लिटिल चॅम्प्सना मार्गदर्शन करणारे पंचरत्न यांच्यासाठी देखील या लिटिल चॅम्प्सना जज करणं कठीण जातंय यात शंका नाही.