सत्य घटनेवर आधारित झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' सध्या प्रचंड चर्चेत आहे. वास्तविक जीवनात काय घडले हे माहित असूनही मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता असते. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की किती चतुराईने अजितकुमार त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे ठरवतो. कोर्टात आर्या या निष्णात वकिलाविरुद्ध अजितकुमार आपली बाजू अत्यंत निर्भीडपणे मांडतो आणि आपण देवीसिंग नसून डॉक्टर अजितकुमार देव आहोत हे सगळ्यांना पटवून देतो.
‘देवमाणूस’ ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. त्यामुळेच जेव्हा ठोस पुराव्यांअभावी कोर्ट देखील अजितकुमारची सुटका करणार असते त्यावेळी कथेत एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत एका नवीन व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे. चंदा ही व्यक्तिरेखा लवकरच मालिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही भूमिका अभिनेत्री माधुरी पवार निभावणार आहे. टीव्हीवर अजितकुमारची निर्दोष सुटका होणार हे ऐकून चंदा गोंधळात पडते. पण याच चंदाचा चेहरा पाहून कोर्टात अजितकुमारची शुद्ध हरपते.