तरुण वयात आपल्यावर जिवापाड प्रेम करणारं, आपली वाट पाहणारं कोणीतरी असावं असं प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटत असतंच परंतु प्रेमाचं नातं म्हणलं की ते निभावण्याच्या जबाबदारीपासून मुलं पळू काढू लागतात, नात्याची जबाबदारी निभवण्याच्या थकव्यापेक्षा नात्यापासून, प्रेमापासून पळण्याचा थकवा जास्त असतो का? काय करायचं नेमकं ? असा कॉम्प्लिकेटेड प्रश्न मुलांना पडतो आणि नातं तर हवंच, प्रेमही हवं, त्यासाठी तयारी हवी, पण नाही जमलं तर? मध्येच डाव मोडावा वाटला तर? नात्यासाठी समर्पण महत्वाचं की स्वत:साठीचं उत्तरदायित्व? काय करायचं नेमकं? असे कॉम्प्लिकेटेड प्रश्न अनेक मुलींना पडतात. यावर उत्तर म्हणजे ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड'.
आजच्या तरुणाईला आपलेसे वाटतील असे सचिन, सायली आणि सुरेखा या एकमेकांचे जिगरी दोस्त असणारे आणि त्याच बरोबर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे तिघेजण भेटतील ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या स्टोरीटेल मराठीच्या नव्या कोऱ्या करकरीत ऑडीओ सिरीजमध्ये. गावाच्या पारापासून ते मेट्रो सिटीच्या कॅफेपर्यंत कुठेही कट्टा टाकणाऱ्या कोणत्याही तरुण तरुणींच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या सारख्याच आणखी तीन मुलभूत गरजा म्हणजे, रिलेशनशिप स्टेट्स, करियरचा सक्सेस आणि वाय फायचा स्पीड. यात रिलेशनशिप स्टेट्स सिंगल आहे की कमिटेड याचा परिणाम करियरवर व्हायला वेळ लागत नाही आणि वाय फाय स्पीडवरच तर तुम्ही सिंगलचे कमिटेड होणार की नाही, हे ठरत असतं.
‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड' या ऑडीओ सिरीजला आवाज दिला आहे गुणी अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि उत्तम लेखक आणि अभिनेता असणाऱ्या साईनाथ गणूवाड याने. या सिरीजसाठी पूजा आणि साईनाथ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ही गोष्ट मराठवाडा आणि पुणे अशा दोन ठिकाणी घडते, त्यामुळे त्या त्या व्यक्तिरेखांचे आवाज, भाषेचे बारकावे समजून उमजून घेऊन त्याच बरोबर गोष्ट वाचनातून वेगवान ठेवण्याचे काम त्यांनी एकमेकांच्या मदतीनं पेलेलं आहे.