मुंबई- कॉमेडियन कपिल शर्मा याची मुंबई पोलिसांनी दिलीप छाब्रिया कार घोटाळा प्रकरणी जबाब नोंदवला आहे. २०१७मध्ये कॉमेडियन कपिल शर्मा याने दिलीप छाब्रिया यांच्या सोबत व्हॅनिटी व्हॅनच्या संदर्भात व्यवहार केलेला होता. मात्र यात आर्थिक फसवणूक झाल्याने कपिल शर्मा याने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कपिल शर्मा यास पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आले होते. कपिल शर्मा याने क्राइम ब्रांच कार्यालयात येऊन त्याच्यासोबत घडलेला प्रकार हा मुंबई पोलिसांना सांगितलेला आहे.
काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्याकडून १२६ अवंती कार बनवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९० कार एकाहून अधिक व्यक्तींच्या नावाने कर्ज घेऊन विकण्यात आलेल्या होत्या. हरियाणा, तामिळनाडू व देशातील इतर राज्यांमध्ये एकाच गाडीच्या चेसी नंबरवर अनेक राज्यात रजिस्टर करून त्यावर विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यात आले होते. जवळपास शंभर कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अगोदरच पोलिसांनी छाब्रिया यांना अटक केली आहे.
हेही वाचा - नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली