गेली जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या तडाख्यामुळे सर्वांच्या आयुष्यात उलथापालथ झाली होती. आता कोरोनाचा विळखा सैल झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात बरीच लग्ने पुढे ढकलण्यात आली होती. साहजिकच ‘लग्नाळू’ जोडप्यांसोबतच इतरांनीही लग्नात होणारी मौजमस्ती ‘मिस’ केली होती. आता होणाऱ्या लग्नांत वर्हाडी ती कसर भरून काढताना दिसतील. आणि त्यासाठी एक नवीन गाणे बाजारात आले आहे ज्याचं नाव आहे, 'आवरा याला'. यंदाच्या वरातीत वऱ्हाडयांना ठेका धरायला लावण्यास 'आवरा याला' हे गाणे सज्ज झाले असून 'आवरा याला' म्हणेपर्यंत प्रत्येकजण नाचेल यात शंका नाही.
दिवाळी संपताच आता लगीनघाईला सुरुवात होईल. नव वधूवरांचे भेटणे, नव्या संसाराची सुरुवात यासाठी वधू-वर उत्सुक असतील. लग्नाचा सिझन आला की वरातीत वाजणाऱ्या गाण्याकडे रसिकांचे अधिक लक्ष असते. असेच नव वधू-वरांचे पीबीए म्युझिक प्रस्तुत आणि निर्माते अँजेला व तेजस भालेराव निर्मित खास 'आवरा याला' हे गाणे यंदाच्या वरातीत वऱ्हाडयांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झाले आहे. विनोदी कल्ला करण्यास वैभव लोंढे याचे 'आवरा याला' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. राहुल चव्हाण आणि मानसी सुरवसे ची जोडी या गाण्यात नव वधू वराच्या भूमिकेत दिसणार आहे.
'आवरा याला' या गाण्यात गाण्याच्या नावावरूनच नवऱ्या मुलाला लागलेली लगीनघाई आणि लग्नासाठी असलेली त्याची उत्सुकता गाण्याच्या पोस्टरवरूनच पाहायला मिळतेय. या गाण्याला गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणून वैभव लोंढे याची उत्तम साथ लाभली आहे. या तीनही महत्वपूर्ण भूमिका सांभाळत त्याने या गाण्यात अभिनय ही साकारला आहे. या गाण्यात वैभव सह अभिनेत्री मानसी सुरवसे, प्रियांका जाधव, अभिनेता राहुल चव्हाण, तुषार खैर, अभिजीत थोरात हे कलाकार झळकणार आहेत.